साताऱ्यात पुन्हा राजकीय मनोमिलनाची चर्चा

लोकसभेसाठी उदयनराजे – शिवेंद्रराजेंची एकत्रित बैठक

सातारा –  गेल्या अडीच वर्षातील आंतरविरोधाच्या टोकदार जखमा बाजूला ठेऊन खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी साताऱ्यात एकत्र बसून चर्चा केली. झाले गेले गंगेला मिळाले, असे म्हणत दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे लोकसभेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. या राजकीय मनोमिलनाची साताऱ्यात दिवसभर चर्चा होती. येथील महाराजा हॉटेलच्या रूम नं 77 मध्ये सोमवारी रात्री साडेनऊ वाजता दोन्ही चुलत भावांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचे मायक्रो प्लॅनिंगवर चर्चा केली.

खा. उदयनराजे यांचे समर्थक सुनील काटकर व नरेंद्र पाटील यांनी पुढाकार घेऊन ही बैठक घडवून आणली. मागील सगळ्या वादांवर पडदा टाकून आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीत मदत करावी, ही अपेक्षा व्यक्त केली. ही बैठक अत्यंत गोपनीय झाली. मात्र सकारात्मक चर्चा आणि शरद पवार यांचा आदेश या बाबींमळे साताऱ्यात भाऊबंदकीचा गृहकलह माजणार नाही, हे निश्‍चित झाले असून राजकीय अनिश्‍चिततेचे सावट दूर झाले आहे.

नगरपालिका निवडणुकांमधील वेदांतिकाराजे भोसले यांचा पराभव, त्यानंतरचा सुरूची राडा या सगळ्याच सलणाऱ्या राजकीय अनुभवांमध्ये राष्ट्रवादी म्हणून आमदार शिवेंद्रराजे भोसले सातारा विधानसभा मतदारसंघात प्रचंड आक्रमक झाले होते. त्यामुळे दोन भावांमधील राजकीय संघर्ष राष्ट्रवादीसाठी डोकेदुखीचा विषय झाला होता. मात्र पवारांच्या यशस्वी शिष्टाईनंतर मनोमिलनाचा पुढील अंक महाराजा हॉटेलच्या रूम नं 77 येथे पार पाडला. दोन्ही नेत्यांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेऊन पक्षासाठी एकत्र येण्याचा समंजसपणा दाखवला. येत्या 24 मार्च रोजी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ कराडात फुटणार आहे. त्याआधीच दोन्ही नेत्यांनी केलेल्या राजकीय मनोमिलनाचं राजकीय वर्तुळात स्वागत होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)