कृष्णा खोऱ्यात 10 टीएमसी पाणीसाठा देण्याचा विचारविनिमय

सातारा – राज्य शासनाने कोयना धरणाच्या जलनितीमध्ये बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असला तरी या निर्णयाचा फटका कोयना जलविद्युत प्रकल्पाला बसू नये याची दक्षता घेवूनच कोयनेच्या जलनीतीत बदल केला जाईल. पश्‍चिमेकडे वीज प्रकल्पासाठी दिल्या जाणाऱ्या पाणीसाठ्याला धक्का न लावण्याचे धोरण असले तरी कृष्णा खोऱ्यात 10 टीएमसी पाणीसाठा देण्यावर विचारविनिमय सुरू असल्याची माहिती शासनाने नियुक्त केलेल्या अभ्यास गटाचे सदस्य जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त सचिव व कोयना प्रकल्पाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता श्रीकांत हुद्दार व दि. ना. मोरे यांनी दिली.

कोयना धरणाच्या जलनितीमध्ये बदल करून पश्‍चिमेकडील वीज प्रकल्पासाठी दिला जाणारा पाणीसाठा पूर्वेकडे कृष्णा खोऱ्यात वळवण्याच्या विचाराधीन आहे. शासनाने यासाठी एका अभ्यास गटाची निर्मिती केली आहे. या अभ्यास गटातील सेवानिवृत्त जलसंपदा विभागाचे सचिव श्रीकांत हुद्दार, दि. ना. मोरे यांनी गत दोन दिवस कोयना प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कोयना संकल्पचित्र मंडळ पुणेचे अधीक्षक अभियंता एस एम सांगळे, महानिर्मिती कंपनी मुंबईचे मुख्य अभियंता अभिजीत कुलकर्णी, महानिर्मिती कंपनी पोफळीचे मुख्य अभियंता विजय तायडे, सेवानिवृत्त मुख्य अभियंता चंद्रशेखर बाबर, अधीक्षक अभियंता ब्रम्हानंद कोष्ठी, कार्यकारी अभियंता राजेंद्र इकारे कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी श्रीकांत हुद्दार म्हणाले की, पिण्याच्या पाण्यासाठी व शेती सिंचनासाठी राज्यात पाण्याची मागणी मोठया प्रमाणात होत आहे. कोयनेत मुबलक पाणीसाठा आहे. कोयनेतील या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वीज निर्मितीसाठी केला जात असला तरी राज्यात अन्य पर्यायाच्या माध्यमातून वीजनिर्मिती करणे शक्‍य आहे. यामुळे पश्‍चिमेकडे देण्यात येणारा 67.50 टीएमसी पाणीसाठा हा वेगवेगळ्या माध्यमाचा वापर करून कृष्णा खोऱ्यात वळविता येणे शक्‍य आहे. पश्‍चिमेकडे वीज निर्मिती झाल्यानंतर समुद्रामार्गे वाया जाणारे 67.50 टीएमसी पाणीसाठा वाया जातो. तो वाया जावू न देता तेच पाणी कोयना धरणात उदचंन योजनेच्या माध्यमातून परत आणून त्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)