#चर्चा: इव्हीएम साशंकता : वास्तव काय? 

अशोक सुतार 
इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशीनमधील (इव्हीएम) बिघाड आणि छेडछाडीच्या अनेक घटना देशात घडल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला विजय मिळत असल्याने इव्हीएमबाबत साशंकता आहे. सन 2019 ची सार्वत्रिक निवडणूक मतपत्रिकांद्वारे घेण्यात यावी, अशी मागणी 17 राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. 
मतदानासाठी मतपत्रिकेच्या वापराची मागणी करणाऱ्या पक्षांमध्ये तृणमूल कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षांचा समावेश आहे. सप नेते रामगोपाल यादव म्हणाले होते की, आगामी लोकसभा निवडणूक इव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे घेतली जावी. अन्यथा त्यासाठी आंदोलन करण्यात येईल. दरम्यान, देशात गेल्या काही काळात झालेल्या निवडणुकांदरम्यान विरोधीपक्षांनी इव्हीएममध्ये छेडछेड केल्याचे आरोप केले आहेत.
सन 2014 नंतरच्या निवडणुकांमध्ये इव्हीएमलाच पक्षांच्या पराभवाला जबाबदार धरण्यात आले होते. त्याचबरोबर उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर बसपा आणि सपा या पक्षांनी इव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला होता. पंजाबमधील निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील इव्हीएममधील फेरफारीचा मुद्दा उपस्थित केला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशीनऐवजी मतपत्रिकांच्या माध्यमातून मतदान घ्यायला हवे, अशी मागणी देशातील राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
या प्रकारांमुळे राजकीय स्तरावर टीकाही केली जात आहे. इव्हीएममध्ये जर ठराविक माहिती सेव्ह केली, तर त्यात नोंद केलेली मते ठराविक उमेदवारालाच मिळतात, असा विरोधकांचा गेली तीन वर्षांपासून संशय आहे. इव्हीएमच्या वापराबद्दल राजकीय नेतेच नव्हे तर काही तज्ज्ञांनीही संशय व्यक्‍त केला आहे. दरवेळी भाजपा अनेक ठिकाणी निवडून येत आहे. आज देशातील 20 च्या वर राज्यांत भाजपाची सत्ता आहे. याला कदाचित मोदी लाट कारणीभूत असावी, असेही काही जणांचे मत आहे. परंतु नोटबंदी व जीएसटीच्या केंद्र सरकारच्या अंमलबजावणीनंतर देशात पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलने होत असताना त्यांच्याच पक्षाला म्हणजे भाजपाला बहुमत कसे काय मिळते, याबाबत जनतेत साशंकता आहे.
सुरुवातीला इव्हीएमच्या मुद्द्यावर टीका केली जात होती; परंतु सरकारने कटू निर्णय घेतले व सर्वसामान्य लोक सरकारवर नाराज असतानाही भाजपाला प्रत्येक निवडणुकीत कसे काय बहुमत मिळत आहे, याबद्दल जनतेत साशंकता मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. इव्हीएमचा वापर सत्ताधारी पक्ष आपल्या सोयीनुसार करत असल्याची ही अफवा म्हणावी की, सत्य; याबाबत तर्क-वितर्क कायम आहे. तो नाकारता येत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही निवडणूक मतपत्रिकेद्वारे करण्यापेक्षा डिजिटल तंत्राने म्हणजेच इव्हीएमद्वारे करण्यास पसंती दिली आणि आग्रहही धरला आहे. विरोधी पक्षांना एकसारखी हार पत्करावी लागत असून त्याचे कारण म्हणजे एव्हिएम आहे, अशा प्रकारचा फोबिया विरोधकांच्या मन आणि मेंदूत घट्ट रुजला आहे. त्यामुळेच येत्या निवडणुकीत इव्हीएमचा वापर नको, असा विरोधकांचा कोलाहल सुरू आहे, असे म्हणावे लागेल. मतदाराने ज्या उमेदवाराला मत दिले आहे; ते मत त्याच उमेदवाराला मिळाले आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी व्हीव्हीपीएटी मशीन वापरले जाते. इव्हीएमद्वारे मतदान होते. मात्र या यंत्रणेत काही बिघाड झाल्यास किंवा तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास व्हीव्हीपॅटद्वारे खात्रीशीर मतमोजणी केली जाऊ शकते.
मतदाराने मत दिल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीन तत्क्षणी त्याची एक स्लिप मतदाराला दिसते. मतदार इव्हीएमवर उमेदवाराच्या नावासमोरचे बटन दाबतो. त्याचवेळी उमेदवाराचे नाव, क्रमांक आणि चिन्ह यांचा उल्लेख असलेली व्हीव्हीपॅट स्लिप 7 सेकंद मतदाराला दिसते. त्यानंतर आपोआप ही स्लिप कट होऊन बीप वाजतो आणि स्लिप सीलबंद पेटीत जमा होते. मतदान करताना काही तांत्रिक अडचण उद्‌भवली असेल, तर त्याचीही माहिती दिली जाते. आपण केलेल्या मतदानाची सत्यता पडताळण्याची संधी मतदाराला मिळते. व्हीव्हीपॅट मशीन उघडण्याचा अधिकार फक्‍त निवडणूक अधिकाऱ्यांना असतो. मतदारांना व्हीव्हीपॅट मशीन उघडता येत नाही. दुसरीकडे, इव्हीएममध्ये गडबड असल्याचे आरोप निवडणूक आयोगाने नाकारले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने मतदारांचा मतदान यंत्रणेवरचा विश्‍वास वाढावा यासाठी सन 2013 मध्ये निवडणूक आयोगाला व्हीव्हीपॅट लागू करण्याचा आदेश दिला होता. पुढच्या वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोग 16 लाख व्हीव्हीपॅट मशीन वापरणार आहे. ही सगळी मशीन्स सप्टेंबर 2018 पर्यंत निवडणूक आयोगाला मिळणार आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने व्हीव्हीपॅटचा मुद्दा चर्चेत आला. या निवडणुकीवेळी मतदान थांबवण्यात आले होते. जवळपास 450 केंद्रावर इव्हीएममध्ये बिघाड झाल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. किमान 34 मतदान केंद्रांवर मतदान थांबवण्यात आले होते.
गुजरातमधून इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट आणण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोध केला होता. उष्णतेमुळे इव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे स्पष्टीकरण आयोगाने दिले होते. इव्हीएम हॅक करून दाखवण्यासाठी राजकीय पक्षांना आमंत्रित केले जाते. मात्र कोणत्याही पक्षाला यशस्वीरीत्या हॅकिंग करता आलेले नाही, अशी प्रतिक्रिया माजी मुख्य निवडणूक आयुक्‍त नीला सत्यनारायण यांनी दिली होती. इव्हीएम मशीनच्या निवडणुकीतील वापराबाबत विरोधकांत साशंकता निर्माण होण्यामागे भाजपला निवडणुकांत सातत्याने मिळणारे यश. मात्र, निवडणूक आयोगासह सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी इव्हीएमबाबतचे संशयाचे धुके नाहीसे करण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)