चर्चा: कुटुंबसंस्था टिकवण्याचे आव्हान

विलास पंढरी

माणूस कुटुंबवत्सल प्राणी आहे. वसुधैव कुटुंबकम्‌ ही भारतीय संस्कृती आहे. कुटुंब म्हणजे परस्परांशी नाती असलेल्या माणसांचा समूह. माणसांमधील नाती ही जन्मावरून, विवाहावरून अथवा दत्तक घेण्यावरून निर्माण होतात. हल्ली बहुधा रक्‍ताच्या नात्यातील लोक एकत्र राहताना दिसतात. कुटुंबसंस्था एकत्र अथवा विभक्‍त अशी दोन्ही प्रकारची असू शकते. विभक्‍त कुटुंबसंस्थेत आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी असे प्राथमिक घटक असतात. एकत्र कुटुंबपद्धतीत इतर दुय्यम नातेसंबंधांचाही अंतर्भाव होतो. साधारणतः पुरुष (वडील) हा कुटुंबाचा प्रमुख असतो. एकत्र कुटुंब पाहायला मिळणे हल्ली विरळ होत आहे.

15 मे, 1994 रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंबदिन साजरा करण्यात आला होता. आजच्या व्हॉट्‌सऍप, ट्विटर आणि फेसबुकच्या जमान्यात विभक्‍त कुटुंब पद्धतीचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अनेकदा मुलांची त्यातून फरफट होते आहे. मुळातच डे केअरपासून आयुष्याची सुरुवात करणाऱ्या मुलांना घरचे संस्कार कुठून मिळणार? “छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ या संकल्पनेचे लोकसंख्या नियंत्रणासाठी अनुकरण केल्याने नवीन पिढी कौटुंबिक स्वास्थ्य हरवून बसली आहे. त्यामुळे आजीच्या हातचे जेवण, आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी या सुखाला नातवंडे मुकतात. अशा परिस्थितीत त्यांना कुटुंबाची जाणीव होण्यासाठी दरवर्षी 15 मे रोजी “जागतिक कुटुंबदिन’ साजरा करण्याची कल्पना पुढे आली असावी.

भारतीय लोकांनी कुटुंबव्यवस्था जतन केली आहे म्हणून ते समाधानी जीवन जगत असून मूळ अमेरिकन आणि ब्रिटिश लोक मात्र आर्थिकदृष्ट्या संपन्न असूनही तेवढे समाधानी नाहीत, असे एका सर्वेक्षणाअंती समोर आले आहे. या लोकांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे आज या विकसित देशांत कुटुंबव्यवस्था जतन करण्याचे आवाहन केले जात आहे. जागतिक कुटुंब दिवस पाळण्याची कल्पना त्यातूनच निर्माण झालेली आहे. अलीकडच्या विभक्‍त कुटुंब पद्धतीला तडा देत आजी-आजोबा, आई-बाबा, काका-काकू, चुलत भावंडे अशी एकत्रित राहणारी काही अपवादाने आढळणारी “मोठी सुखी कुटुंबंही’ आहेतच.

मानवी संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळात मातृसंस्कृती अस्तित्वात होती. स्त्री ही कुटुंबप्रमुख होती. तिची मुले आणि इतर पुरुष (भाऊ, पिता, मुलगा) हे या मातृकुटुंबाचे सदस्य असत. हे मातृसत्ताक कुटुंब पोसण्याची धमक जोपर्यंत स्त्रीकडे होती तोपर्यंत तिच्या वंशावळीचे महत्त्व टिकून होते. तेव्हा स्त्रीचे स्थान कुटुंबप्रमुखाचे आणि अतिशय महत्त्वाचे होते. जेव्हा केव्हा अपत्यजन्माचा संबंध पुरुषाशी आहे हे लक्षात आले तेव्हापासून पुरुषप्रधान संस्कृतीचा उगम होत स्त्रीवर, विशेषतः पत्नीवर स्वामित्व गाजवण्याची सुरुवात झाली असावी. पुढे शेतीत नांगरासारख्या यंत्रांचा वापर सुरू झाल्यावर पुरुषाची शेतीतील भूमिका दिवसेंदिवस स्त्रीपेक्षा महत्त्वाची होत गेली. पुरुषाच्या हातात सामाजिक सत्ता आली.

जमीनदार पुरुषांचे महत्त्व वाढत गेले व नैसर्गिक मातृसत्ताक कुटुंब पद्धतीची जागा पुरुषसत्ताक कुटुंबव्यवस्थेने घेतली. प्रारंभिक इतिहासातील महत्त्वाचे शोध उदा. अन्नप्रक्रिया, अन्न साठवणूक, पशुपालन, बालसंगोपन, शिवणकाम वगैरे स्त्रियांनीच लावले. त्यानंतर शेकडो वर्षे ती सर्व तंत्रे स्त्रियांनीच टिकवित विकसित केली. खरे तर भारतातली बरीचशी कुटुंबे आज स्त्रीच्या त्यागावरच उभी आहेत. इतके करूनही जर कुटुंबामध्ये, समाजात त्यांना मान, आदर मिळाला नाही तर नको तो स्त्री जन्म, नको ते लग्न आणि नकोच ते कुटुंब अशी आधुनिक स्त्रीची प्रतिक्रिया व मानसिकता झाल्यास नवल नाही. याचेच प्रत्यंतर म्हणून लिव्ह-इन-रिलेशनशिप हा प्रकार समाजात सुरू झाला आहे. पण सहजीवनाची ही पद्धत सामाजिक हिताची नाही. यामध्ये मुलांचा विचार तर केलेला नाहीच, पण कुटुंबातील वृद्ध, अपंग यांचाही विचार होत नाही. आजपर्यंत या सगळ्या जबाबदाऱ्या घरातील स्त्रीच्या मानल्या गेल्या व तिने त्या निभावल्याही आहेत. पण आता ही गृहिणी या दुय्यम स्थानास कंटाळली आहे. म्हणून आपल्याला कुटुंबसंस्थेचा कणा स्त्री आहे हे लक्षात घेऊन तिच्या अपेक्षा, तिच्या गरजा आपण समजावून घ्यायला हव्यात.

कुटुंबसंस्थेची अधिक मोडतोड होण्यापूर्वीच ती सावरली पाहिजे. म्हणून कुटुंब सर्वांचे आणि सर्वांसाठी कुटुंब हा विचार आचरणात आणला पाहिजे. अन्यथा जुनी ग्रीक संस्कृती जशी कुटुंबव्यवस्था विस्कळीत झाल्याने लोप पावली तसेच महान म्हणून मिरवत असलेल्या आपल्या संस्कृतीचेही होऊ शकते.

अनेक विकसित राष्ट्रांना कुटुंबसंस्थेचे महत्त्व आता कळले असून जगातल्या अनेक देशात कुटुंबव्यवस्था टिकावी म्हणून त्यावर अध्ययन व संशोधन करणाऱ्या संस्था तयार झाल्या आहेत. भारतात मात्र असे कुटुंब अध्ययन केंद्र सुरू झाल्याचे अद्यापपर्यंत तरी ऐकिवात नाही. सरकारी पातळीवर कुटुंब नियोजन या शब्दाऐवजी कुटुंब कल्याण हा शाब्दिक बदल केल्याने फारसे हाशील होण्यासारखे नाही. कुटुंबविषयक धोरण म्हणजे कुटुंब नियोजनाचे धोरण नव्हे. अर्थात कुटुंबनियोजनामधेही पुरुष मागेच आहेत. मूल होऊ नये म्हणून करावी लागणारी शस्त्रक्रिया पुरुष व स्त्री दोघेही करू शकतात. पुरुषावर होणाऱ्या शस्त्रक्रियेपेक्षा स्त्रीवर होणारी शस्त्रक्रिया कठीण व त्रासदायक असूनही एकंदरीत अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये पुरुषांचे प्रमाण 10 टक्‍केही नाही. म्हणजेच बालसंगोपनाबरोबर कुटुंबनियोजनाची जबाबदारीही स्त्रीवर टाकून पुरुष मोकळा झालेला आहे.

कुटुंबव्यवस्था जगवायची असेल, ती काळाभिमुख करायची असेल तर त्यासाठी सर्वांचा हातभार लागायला हवा. या कुटुंबात प्रत्येकाला व्यक्‍तिविकासाची संधी मिळायला हवी. कुटुंबातील लहान मुले, वृद्ध, अपंग यांची जबाबदारी सर्वांनी सारखी वाटून घ्यायला हवी. त्यासाठी आधुनिक काळानुसार राहत्या जागा बघता पती-पत्नी, मुले व आई-वडील, शक्‍यतो दोघांचे असे आदर्श कुटुंब ठरू शकेल. यामुळे मुलांना डे केअरमध्ये ठेवायची वेळ येणार नाही तर आजी-आजोबांना वृद्धाश्रमात पाठवण्याची वेळ येणार नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)