चर्चा : भारतरत्न : उपेक्षित वि. दा. सावरकर 

विठ्ठल वळसे-पाटील 

नुकत्याच पार पडलेल्या 70 व्या प्रजासत्ताक दिनाला केंद्र सरकारने सर्वोच्च गणला जाणारा भारतरत्न पुरस्कार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख, संगीतकार भूपेन हजारिका या तीन विभूतींना दिला. परंतु स्वातंत्रप्राप्तीच्या 75 नंतरही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मात्र उपेक्षित राहिले आहेत. 

गेली अनेक वर्ष शिवसेना आणि भाजपा व हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मंडळींनी कॉंगेस सत्तेत असताना सावरकरांना “भारतरत्न’ देण्याची मागणी लावून धरली होती. परंतु सत्ता आल्यनंतरही स्वा. सावरकर मात्र उपेक्षित राहिले. भारतीय स्वातंत्र्यसैनिक, कवी, लेखक नाटककार, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. परंतु या महानेत्याला अनेक वर्ष मात्र खऱ्या सन्मानापासून दूर ठेवले गेले. सतत उपेक्षा केली गेली व या ना त्या कारणाने ते टीकेचे धनी बनले. सावरकर समजण्यासाठी संपूर्ण सावरकर वाचावे लागतील. त्यांच्यातील विज्ञाननिष्ठपणा, व राष्ट्रीय बाणा समजेल. उगीच उठसुट क्रांतिसूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करणारी व ब्राह्मणवाद वाढवणारी मंडळी चांगलीच ठाण मांडून बसली आहे. त्यांनी सावरकर समजून घ्यावेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“लेखण्या मोडा, बंदुका उचला…’

वर्ष 1938 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना सावरकरांनी, “देशाची परिस्थिती पाहता साहित्यिकांना दुय्यम व तिय्यम कर्तव्य असून राष्ट्रीय जीवनाचे संरक्षण हीच आपल्या साहित्याची आद्य चिंता, मुख्य साध्य असले पाहिजे. लेखणी मोडून टाकावी नि बंदूक उचलावी. पुढील दहा वर्षांत सुनिते रचणारा एकही तरुण नाही निघाला तरी चालेल, साहित्य संमेलने नाही झाली, तरी चालतील; पण दहा-दहा सहस्र सैनिकांच्या वीरचमू आपल्या खांद्यांवर नव्यातील नव्या बंदुका टाकून राष्ट्राच्या मार्गा-मार्गांतून, शिबिरा-शिबिरांतून टप टप करीत संचलन करतांना दिसल्या पाहिजेत,’ इतके सावरकरांनी वेळ ओळखून भाष्य केले होते. काळ्यापाण्याच्या नरकयातना भोगून आलेला महान कवी त्याकाळीही समजला नाही आणि आजही समजला नाही.
विपुल लिखाण

सावरकरांनी विपुल लिखाण केले. त्यामध्ये “1857 चे स्वातंत्र्यसमर’ हे महत्वाचे असून 1857 ला बंड, सैनिकांची भाऊगर्दी, शिपायांचे कारस्थान असे न म्हणता त्यांनी स्वातंत्र्यसमर म्हणून गौरविले. ते क्रांतिकारकांची प्रेरणा ठरले. रत्नागिरीत कर्मठ ब्राह्मण व्यवस्थेत दलितांच्या हस्ते पतितपावन मंदिराची उभारणी करून “वेदोक्ता’चा अधिकार सर्वासाठी खुला करायची भूमिका घेतली. “जयोस्तुते’ आणि “सागरा प्राण तळमळला’ ही गीते म्हणजे सार्वकालिक श्रेष्ठ कलाकृती ठरल्या आहेत. देशाची प्रेरणा गीते झाली आहेत. मार्सेलिसच्या समुद्रात उडी मारून भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्‍न जागतिक व्यासपिठावर नेणारे द्रष्टे स्वा. सावरकर!
जगविख्यात उडी

8 जुलै 1910 रोजी “मोरिया’ याबोटीतून उडी मारून मार्सेलिसच्या सागरी साहसाचे दर्शन संपूर्ण जगाला दिले. या साहसाने भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्‍न प्रथमच जागतिक व्यासपीठावर अतिशय आवेगाने चर्चिला गेला. हिंदुस्थानचे स्वातंत्र्य हा सगळ्या दुनियेचा आस्थेचा आणि चिंतेचा विषय झाला. “फ्रान्सच्या भूमीवर अवैध मार्गाने झालेली अटक हा ब्रिटिशांकडून सावरकरांवर झालेला घोर अन्याय आहे,’ असे मत कार्ल मार्क्‍सचा नातू लोंगे याने मांडले. ते युरोपीय प्रसारमाध्यमांनी उचलून धरले.
अखेर

26 फेब्रुवारी 1966 या दिवशी सकाळी 11 वाजता सावरकरांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या त्या आत्मार्पणास प्रा. शिवाजीराव भोसले यांनी “वैज्ञानिक समाधी’ असे लिहिले. वीर सावरकरांकडे विज्ञाननिष्ठा, अध्यात्मावरची निष्ठाही अढळ, अटळ आणि अपराजित होती. विज्ञान व अध्यात्मशास्त्र यांचा सुरेख संगम त्यांच्या जीवनात झाला होता.अनेक बाबतीत सावरकर हे जगात श्रेष्ठ आहेत. एका ठिकाणी एका कीर्तनकाराने म्हटले आहे की, “भगवद्‌गीता ज्यांनी आत्मसात केली त्यांनाच तात्याराव सावरकर कळतील.’ भारतरत्न या पुरस्काराचे खरे दावेदार; मात्र या राजकारण्यांनी त्यांना नेहमी दुर्लक्षित ठेवले, ही भारतीय राजकारणातील निंदनीय घटना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)