लक्ष्मी कऱ्हाडकरांविरोधात अविश्‍वास ठराव

सत्ताधारी गटासह 13 नगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पाचगणी – आ. मकरंद पाटील यांच्या करिष्म्याने पाचगणीत राजकीय भूकंप झाला आहे. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून सत्ताधारी गटातील 4 नगरसेवकांसह तब्बल 13 नगरसेवकांनी नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालायत अविश्‍वास ठराव दाखल केला आहे. दरम्यान, नगराध्यक्षांनी पालिकेत मनमानी, एकाधिकारशाही चालवली आहे.

या मनमानीने पालिकेचे आर्थिक नुकसान केले असल्याचा आरोप करीत पालिकेला स्वतःच्या स्वार्थासाठी अडचणीत आणणाऱ्या नगराध्यक्षांना पदमुक्त करावे अशी मागणी शिवसेना पाचगणी शहरप्रमुख संजय कासुर्डे यांनी पत्रकार परिषदेत केली. थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी गेल्या अडीच – तीन वर्षात त्यांनी पदाचा गैरवापर केला आहे. त्यांनी मनमानीने पाचगणीच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी पत्र लिहून पाचगणीतील कोणत्याहीनगरसेवकाला कसलीही माहिती देऊ नये असा लेखी आदेशच दिला असल्याचा थेट आरोप करून कासुर्डे म्हणाले, नगराध्यक्षांनी लेटरहेडवरील पालिकेचा लोगो आणि पालिकेचा शिक्का वापरून नगराध्यक्षांनी अरुण किसन भिलारे यांना बीअर शॉप हा व्यवसाय करणेस ना हरकत दाखला दिलेला आहे.

नगरपालिकेच्या मालकीची इमारत असल्याने त्यांना असा दाखला देण्याचा कसलाही अधिकार नाही. रोज लॅंड स्कूल यांनादेखील नगराध्यक्षांनी अशीच जागा दिली असून त्यासाठी त्यांनी पालिकेचा कसलाही ठराव केलेला नाही. या मिळकतीचा वाद उच्च स्तरीय समितीकडे असताना देखील नगराध्यक्षांनी मनमानीने ही जागा देऊन पालिकेच्या हिताविरोधी भूमिका घेतली आहे. रमेश शंकर खरात यांना साईप्रसाद ऑन लाईन लॉटरी सेंटर या व्यावसायाकरिता,श्रीमती कमल कोंडीबा कांबळे यांना घरबांधणीसाठी, नीलेश प्रकाशसिंह ठाकूर यांना बंदुकीचे लायसन काढण्यासाठी, सुधीर सुभाष मालुसरे यांना चांगल्या वर्तुवणीकीचा व रेशनिंग कार्ड काढण्यासाठी, सखरअली फेसुद्दीन चौधरी यांना आधारकार्ड काढण्यासाठी नगरपरिषदेची काहीही हरकत नाही असा दाखला बेकायदेशीररित्या दिला आहे, असा दावा कासुर्डे यांनी केला आहे. कासुर्डे पुढे म्हणाले, स्वीकृत नगरसेवकांची निवडदेखील नगराध्यक्षांनी गेल्या अडीच वर्षात हेतुपरस्पर केलेली नाही. याबाबत मी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे माहिती मागितली होती.

यावर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे सौ. लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी गैरवर्तणुक केल्याचे स्पष्ट होत आहे. नगराध्यक्षांनी आपला पदाचा गैरवापर, हलगर्जीपणा करून पालिका आणि नागरिकांचे नुकसान केले आहे, असा आरोप देखील कासुर्डे यांनी केला असून अशा नगराध्यक्षाना पदमुक्त करण्याची मागणी देखील कासुर्डे यांनी केली आहे.पत्रकार परिषदेत संजय कासुर्डे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांना पोहोच केलेल्या पत्र सादर केले. यावर विरोधी गटातील विजय कांबळे, नारायण बिरामणे, विनोद बिरामणे, रेखा कांबळे,रेखा जानकर, अनिल वन्ने, पृथ्वीराज कासुर्डे, निता कासुर्डे, हेमा गोळे यांच्यासह सत्ताधारी गटातील विठ्ठल बगाडे, सुमन गोळे, आशा बगाडे, अर्पणा कासुर्डे या तेरा नगरसेवकांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)