आरोग्य विभागाकडून “त्या’ ज्येष्ठांची अवहेलना

किशोर मनतोडे
दहा दिवसांपासून घरात ड्रेनेजचे पाणी : तक्रार करूनही दाद नाही
एका खाटेवर जीव मुठीत धरून बसण्याची वेळ 

दापोडी  – पावसामुळे चेंबर्स तुंबून गुडघाभर पाणी साचलेल्या घरात मागील दहा दिवसांपासून दोन ज्येष्ठ नागरीक जीव मुठीत धरुन दिवस कंठत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे या ज्येष्ठांनी दाद मागूनही दखल घेतली न गेल्याने त्यांच्या घरातील सर्व साहित्य पाण्याखाली गेले आहे. दररोज घरातील पाण्याचा उपसा करायचा आणि एका खाटेवर दिवस-रात्रं बसून दिवस ढकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

मुसळधार पावसामुळे महादेव आळीतील गायकवाड चाळीत ड्रेनेज तुंबून पाणी शिरले आहे. त्यात सतत पाऊस सुरू असल्याने पाणी कमी होण्याचे नाव घेत नाही. येथे वास्तव्यास असलेले मोहन साधु मुगुटमल (वय 96) व भाऊसाहेब मुगुटमल (वय 80) या वृद्ध चुलत बंधुंच्या घरात गुडघाभर पाणी साचले आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड्रेनेज विभागाकडे वारंवार तक्रार करण्यात आली. परंतु, अधिकाऱ्यांनी केवळ पाहणीचे सोपस्कार पार पाडले. चेंबर्स तुंबले आहे. याठिकाणी नवीन चेंबर्स टाकावे लागेल, असे सांगून अधिकारी निघून गेले ते अद्याप फिरकले नाहीत.

मोहन मुगुटमल हे आजारी आहेत. घरात पाणी शिरुन घरातील सर्व साहित्य खराब झाले आहे. पाण्यामुळे दिवस-रात्रं दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. त्यातच डासांचा उपद्रव व इतर किटकांचा त्रास वाढला आहे. घरातील एका खाटेवर बसून दोन्ही भाऊ दिवस ढकलत आहेत. सकाळ झाली की पाणी उपसा करायचा. पाऊस वाढला की मोठ्या प्रमाणावर पाणी घरात शिरते. त्यावेळीही उपसा करुन पाणी घराबाहेर काढायचे हे रोजचे काम त्यांना लागले आहे. शासन ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना व उपक्रम राबवत आहे. मात्र महापालिका प्रशासनाकडून दोन निराधार वृद्धांची अशा पद्धतीने अवहेलना होत असल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

पावसाळ्यात दरवर्षी चाळीतील या घरात चेंबर्स तुंबल्यामुळे गुडघाभर पाणी साचते. ड्रेनेज विभागाचे अधिकारी कर्मचारी तक्रार केल्यानंतर येतात, नवीन ड्रेनेज लाईन टाकू असे सांगून जातात. परंतु, प्रत्यक्षात कारवाई केली जात नाही, अशी खंत भाऊसाहेब मुगुटमल यांनी व्यक्त केली. यासंदर्भात महापालिकेच्या ह विभाग क्षेत्रीय अधिकारी आशा राऊत यांच्याशी संपर्क साधला असता आरोग्य विभागाशी संपर्क साधुन तातडीने उपाययोजना करण्याचे आश्‍वासन त्यांनी दैनिक प्रभातशी बोलताना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)