बालाजी देडगाव – नेवासा तालुक्यातील शहापूर परिसरात बिबट्याने अनेकांच्या कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. यामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. येथील एकनाथ कोलते व रमेश तांदळे यांची कुत्रे दारासमोरुन शेतात ओढत नेत बिबट्याने या कुत्र्यांचा फडशा पाडला. रात्री कुत्रे भुंकण्याचा आवाज आल्याने एकनाथ कोलते यांनी बॅटरीच्या उजेडात बघितले असता त्यांच्या डोळ्यादेखत बिबट्याने कुत्रे ठार केले. त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील ग्रामस्थ जमा झाले. त्यामुळे बिबट्याने धूम ठोकली.
यावेळी बापूसाहेब कोलते, अनिल कोलते, प्रदीप कोलते, सुभाष कोलते आदी उपस्थित होते. या परिसरात ऊस, चिकू व केळीच्या बागा आहेत, या बागाच्या आश्रयाला बिबट्या थांबत आहे. या परिसरातून शाळेतील मुलांची वर्दळ असल्याने त्वरित पिंजरा लावून या बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.