महापालिकेत नवा पायंडा : निविदा प्रक्रियेतच ठेकेदारांना उदंड सवलती
पुन्हा राष्ट्रवादीवर खापर…
वर्षानुवर्षांच्या निविदा प्रक्रियेबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांना विचारले असता त्यांनी ही प्रथा राष्ट्रवादीने आणल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीने चुकीचा कारभार केल्यामुळेच आपणाला सत्ता मिळाली असून आपण राष्ट्रवादीवर खापर फोडण्याऐवजी कारभारात बदल का करत नाही? असा प्रश्न विचारला असता प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले. अत्यंत विश्वासाने शहरवासियांनी भाजपाच्या हाती दिलेली सत्ता नागरिकांचा अपेक्षाभंग करत असल्याचेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या नव-नवे पायंडे पाडण्याचा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने प्रयत्न चालविले आहेत. महापालिकेतील कोणतीही निविदा प्रक्रिया करताना आता सात अन् आठ वर्षांचे ठेके दिले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
महापलिकेची निविदा प्रक्रिया यापूर्वी कामकाजाच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावे या दृष्टीने एक अथवा दोन वर्षांसाठी राबविली जात होती. मात्र भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून महापलिकेत वर्षानुवर्षांच्या निविदा देण्याचा सपाटा चालविला आहे. विशेष बाब म्हणजे या निविदा प्रक्रिया राबविताना ठेकेदारांना उदंड सवलती दिल्या जात असल्यामुळे या निविदा प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. याचे अत्यंत बोलके उदाहरण म्हणजे कचरा उचलण्याच्या ठेक्याचे देता येईल.
महापालिकेच्या सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने कचरा उचलण्याचा ठेका दोन कंपन्यांना तब्बल 8 वर्षांसाठी दिला आहे. तर करारनाम्यात ठेकेदाराला फायदा पोहोचेल याचीच जास्त काळजी घेण्यात आल्यामुळे शहरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महत्त्वाची बाब कचऱ्याच्या समस्येवरून सत्ताधारी नगरसेवक तीव्र नाराजी व्यक्त करत असताना पदाधिकारी मात्र प्रशासनावर जबाबदारी झटकून मोकळे होत आहे. वर्षानुवर्षांच्या निविदा प्रक्रिया राबवू नयेत, अशी मागणी नगरसेवकांसह सर्वसामान्यांमधून होत आहे.