दीपोत्सव : पणत्या, पण केवळ दिवाळीच्या नव्हेत (भाग 1)

-निकेश आमने

दिवाळी आली, घरोघरी, दारोदारी दिवे लागतात. खरं तर दिवाळीला महत्त्व असते पणत्यांचे. तेलाच्या दिव्यांचे. त्यांचा मंद सोज्वळ प्रकाश अंध:कार नष्ट करतो. बाहेरचा आणि अंत:करणातलाही. पण आजकाल झगमगाट करणाऱ्या दिव्यांचे प्रस्थ माजलेले आहे. जे दिव्यांचे, तेच माणसांचेही. काही तरी करणाऱ्या माणसांपेक्षा केलेल्या एवढ्याशाही गोष्टीचा डांगोरा पिटण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, पण आजही मंद तेवणाऱ्या पणत्यांप्रमाणेच शांतपणे कार्य करत राहणारी माणसे आहेत.

प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न काही तरुण-तरुणी गेल्या दीड वर्षांपासून करत आहेत. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामार्फत गावाचा विकास करण्याचं ध्येय समोर ठेवून मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक त्या-त्या गावांमध्ये प्रत्यक्ष राहून काम करत आहेत. यामध्ये काही तरुण मुली सुद्धा आहेत, ज्या त्यांच्या घरापासून दूर राहून विविध अडचणींना सामोरे जाऊन गावांना आदर्श खेड्यांकडे घेऊन जात आहेत. त्यांना आलेले अनुभव इतरांना नक्कीच प्रेरणादायी आहेत. त्यापैकीच मयूरी, शिल्पा, वैष्णवी या तिघी.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्‍यात शंभर टक्के आदिवासी कोलाम समुदाय असलेल्या गणेशवाडी गावात मयुरी अनिल महातळे नावाची तरुणी गेल्या दीड वर्षापासून काम करत आहे. नागपूरसारख्या मोठ्या शहरात जन्मलेली, त्याच शहरात वाढलेली, अभियांत्रिकीची पदवी घेतलेली एक उच्च शिक्षित तरुणी या कोलाम पोडचे रुपडं पालटण्याचा प्रयत्न करत आहे, ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे.

ग्रामीण भागाची कुठलीही पार्श्‍वभूमी नसताना, कोलामी बोलीभाषा बोलणाऱ्या लोकांशी जुळवून घेऊन, त्यांच्या सोबत गावात राहून परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. गावात रेशन दुकानसुद्धा नाही. पोडला जाण्याकरिता आज देखील चार किलोमीटर जंगल तुडवीत जावं लागतं. शेती व शेतमजुरांचे प्रश्‍न बिकट, जमीन कसतात पण सातबारा नावावर नाही, परिणामी शासकीय योजनांचा लाभ मिळवण्याकरिता अनेकांकडे कागदपत्रं नाहीत.

पाणलोट क्षेत्राच्या माथ्यावर असलेल्या गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असली तरी दुसरीकडे दारू मोठ्या प्रमाणात होती. दारूबंदीचा धाडसी निर्णय घेऊन अनेकांचे संसार सावरण्यास मदत केली. लोकांना प्रेरित करून गावाला पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी श्रमदान, जलयुक्त शिवार, रिचार्ज शॉफ्टच्या माध्यमातून प्रयत्न केले. डिसेंबर सुरवातीला जिल्ह्यातील पहिला पाण्याचा टॅंकर लावावा लागणाऱ्या गावाला स्वयंपूर्ण केलं आहे.

गावात रेशन उपलब्ध करून दिले, तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रेरित करून नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या, गावातील लोकांना मत्स्य व्यवसाय सुरू करण्यास मदत केली. अशी अनेक कामे मयुरी महातळे करत आहे. ती म्हणते, या एकएका कामातून गावाचं समग्र परिवर्तन शक्‍य आहे. हे करत असताना बऱ्याचदा तिच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न असतो. जंगलातून एकटीला प्रवास करावा लागतो. पण या सर्व आव्हानात्मक परिस्थितीवर मात करत गाव विकास करण्याचा तिने ध्यास घेतला आहे.

दीपोत्सव : पणत्या पण केवळ दिवाळीच्या नव्हेत (भाग 2)

दीपोत्सव : पणत्या पण केवळ दिवाळीच्या नव्हेत (भाग 3)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)