कॉंग्रेस आमदाराला भाजपकडून 100 कोटींची ऑफर : दिग्विजय यांचा दावा

मध्यप्रदेश सरकार पाडण्याचा प्रयत्न

आरोप सिद्ध करण्याचे भाजपकडून आव्हान

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भोपाळ: बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी मंगळवारी राजकीय गोटात खळबळ उडवून दिली. मध्यप्रदेशातील नवे सरकार पाडण्यासाठी भाजपने एका कॉंग्रेस आमदाराला 100 कोटी रूपयांची ऑफर दिल्याचा दावा त्यांनी केला.

भाजपचे आमदार नारायण त्रिपाठी यांनी कॉंग्रेस आमदार बैजनाथ कुशवाह यांच्याशी संपर्क साधून त्यांना एका ढाब्यावर नेले. तिथे नरोत्तम मिश्रा आणि विश्‍वास सारंग हे भाजपचे माजी मंत्री कुशवाह यांना भेटले. त्यांनी सरकार पाडण्यासाठी कुशवाह यांना 100 कोटी रूपये देण्याची तयारी दर्शवली. मध्यप्रदेशात पुन्हा भाजपचे सरकार आल्यावर मंत्रिपद देण्याचे आमीष कुशवाह यांना दाखवण्यात आले. चार्टर्ड विमान तयार ठेवले असून आमच्याबरोबर या असे कुशवाह यांना सांगण्यात आले. मात्र, कुशवाह यांनी त्यांच्याबरोब जाण्यास नकार दिला, असा दावा दिग्विजय यांनी मध्यप्रदेश विधानसभेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना केला. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (भाजप नेते) यांना पराभव पचवणे जड जात आहे, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.

दरम्यान, मित्रा, सारंग यांच्यासह भाजपच्या विविध नेत्यांनी दिग्विजय यांचा दावा फेटाळून लावला. दिग्विजय यांचे वक्तव्य म्हणजे केवळ पब्लिसिटी स्टंट आहे. पुरावा असल्यास त्यांनी कायदेशीर कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया मिश्रा यांनी दिली. तर दिग्विजय यांनी आरोप सिद्ध करावा, असे आव्हान सारंग यांनी दिले. तर भाजपचे आणखी एक नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी दिग्विजय यांना गांभीर्याने घेतले जाऊ नये, असे म्हटले. दिग्विजय हे गॉसिपमध्ये रस असणारे नेते असल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे, असा शाब्दिक टोलाही त्यांनी लगावला.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पीछेहाट झाल्याने भाजपला मध्यप्रदेशातील प्रदीर्घ सत्ता गमावावी लागली. त्या निवडणुकीत कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला. मात्र, बहुमतापासून काहीसा दूर राहिला. एकूण 230 सदस्य असणाऱ्या विधानसभेत कॉंग्रेसचे 114 आमदार आहेत. इतर 7 आमदारांनी पाठिंबा दिल्याने त्या राज्यात कॉंग्रेस पक्ष सरकार स्थापन करू शकला आहे. प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपचे 109 आमदार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)