अबाऊट टर्न – विषयांतर

संग्रहित छायाचित्र

हिमांशू

ऐन राजकीय गरमागरमीच्या वातावरणात एक अराजकीय मुलाखत प्रसिद्ध झाली आणि यंदा आंबे खूप महाग असल्यामुळं आपल्याला ते परवडणार नाहीत, याची बोचरी जाणीव आम्हाला झाली. त्यातच आंबा कापून खाणे, चोखून खाणे असे शब्दप्रयोग प्रस्तुत मुलाखतीत ऐकल्यावर या दुर्लभ फळाविषयी लव्ह-हेट रिलेशनशिप तयार झाली. खरे तर खास आंबे आणण्यासाठी कोकणात जाण्याचा बेत काही दिवसांपूर्वी आखला होता. त्यानिमित्तानं कोकणात फिरायला मिळणार म्हणून कुटुंबसुद्धा खूश होतं. परंतु आंब्याचे भाव ऐकून पटले, कोकणात जाऊन आंबा खरेदी यंदा नाही परवडणार.

मग ऐनवेळी रजाच मिळत नाही, यंदा उष्णतेची लाट असल्यामुळे कोकणात गेल्यास लाही लाही होईल, अशा सबबी सांगून बघितल्या. त्याचाही परिणाम होत नाही म्हटल्यावर थेट हिशोबच मांडला. म्हटले, कोकणात जाण्या-येण्याचा खर्च जमेस धरला तर आपल्याकडे आंबे स्वस्त पडतील. चार-पाच फिगर्स कागदावर लिहून बेरजा-वजाबाक्‍या केल्यावर आमचे हे म्हणणे घरच्या मंडळींना बऱ्यापैकी पटले. पण तरीसुद्धा पूर्ण समाधान नाहीच झाले. मग आम्ही थेट विषयांतरच केले. म्हटले, दिवाळीच्या सुटीत अंदमानला गेलो तर त्यावेळी तिथे आल्हाददायक वातावरण असेल ना? आमची ही गोळी परफेक्‍ट बसली. अंदमानचे स्वप्न पाहत स्थानिक बाजारातून आंबेखरेदीच्या चर्चा सुरू झाल्या आणि इथेच आम्हाला “विषयांतर’ या शब्दाचे महत्त्व कळले. एक नवा मार्ग सापडला.

आमचे हे विधान पूर्णपणे अराजकीय आहे. कारण कितीही झाले तरी या विधानाला आंब्याविषयी वाटणाऱ्या प्रेमाचा पवित्र गंध आहे. आंब्यासाठी कोकणात जाण्याचा विषय केवळ कुटुंबीयांच्या डोक्‍यातून काढण्यासाठीच केलेले ते विधान नाही, तर आंब्याचा हा विरह आमच्यासाठीही त्रासदायकच आहे. पण खरे प्रेम कधीही पिच्छा सोडत नाही म्हणतात तसेच झाले. “तुम्हाला आंबे खायला आवडतात का?’ हा प्रश्‍न काही दिवसांनी उर्मिला मातोंडकर यांनासुद्धा एका वाहिनीवर विचारला गेला. कशासाठी जखमेवर मीठ चोळतात ही मंडळी! एक तर उर्मिला मातोंडकरांनी सिनेमाचे क्षेत्र सोडून राजकारणात येणे हेच एक मोठ्ठ विषयांतर आहे. त्यामुळे अधिक विषयांतर टाळण्यासाठी त्यांनी या प्रश्‍नाचे उत्तर द्यायला नकार दिला आणि नकळत आम्हाला मदतच केली.

प्रश्‍न गांभीर्याने घेतला असता, तर पुन्हा “आंबा कसा खायला आवडतो?’ हा प्रश्‍न आला असता. आंब्याचा विषय इलेक्‍शनच्या काळात का निघतोय सारखा? तेसुद्धा यंदा आंब्याचे उत्पादन कमी झालेले असताना… दर वाढलेले असताना! “सत्तेवर आलात तर आंब्याचे दर आटोक्‍यात ठेवण्यासाठी काय कराल?’ हा प्रश्‍न मात्र कुणालाच विचारला जात नाही. कधी-कधी वाटते, दोन-पाच एकर जमीन घेऊन हापूसची झाडे लावावीत. मग बोला म्हणावं!

पण हेसुद्धा “मुंगेरीलाल के हसीन सपने!’ अखेर आपण स्वप्नातच जगणारी माणसं. स्वप्नातल्या आकांक्षांना अंत नाही. स्वप्नं झोपेत पाहावीत, तशी जागेपणीही पाहावीत. जमेल तेवढ्या स्वप्नांचा पाठलाग करावा. उरलेली सोडून द्यावीत. पण नाही जमत. निवडणूक आली की स्वप्नांचा डोंगर वाढतो. स्वप्नं विकणारी माणसे अवतीभोवती फिरू लागतात. थोडे दिवस स्वप्नांच्या कुशीत बरे जातात आणि पुन्हा वास्तवाचे चटके नशिबी येतात. जिवाची समजूत घालण्याचा दरवेळी एकच मार्ग… विषयांतर!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)