फरक दृष्टिकोनातला

एका आश्रमात दोन मित्र दाखल झाले, दोघांनाही ठराविक वेळे नंतर सिगारेट पिण्याचे व्यसन होते. लपून छपून सिगारेट पिणे त्यांचा मनाला पटत नव्हते आणि गुरुजींना विचारण्याचे धाडस होईना, संध्याकाळ झाल्यावर त्यांच्या तल्लफने परत उचल खाल्ली, त्यांना काही सुधरेना, मग त्यांनी आपआपल्या परीने गुरुजींकडून परवानगी घेण्याचे ठरवले, दोघेही गुरुजींच्या खोली जवळ पोहोचले, पहिला परवानगीसाठी आत गेला आणि काही वेळाने बाहेर पडला. त्या नंतर दुसरा आत गेला तोही थोड्या वेळाने बाहेर पडला, तो वर पहिला बाहेर थांबून होता. तिथून दोघंही खोलीत आले, खोलीत पोहोचल्यावर पहिल्याने सिगारेटचे पाकीट पेटीतून काढले, हे बघताच दुसरा हबकला, अरे तू पाकीट का काढलंस गुरुजींनी तर नाही सांगितलं ना ! पहिला म्हणाला; नाही, मला तर त्यांनी परवानगी दिली.

दुसरा म्हणाला; असं कसं! मला नाही म्हणालेत तर तुला हो कसे म्हणतील, पहिला म्हणाला; खरं सांगतो रे , मला ते हो म्हणालेत , बरं सांग तू त्यांना काय विचारले ? यावर दुसरा म्हणाला मी विचारले की ईश्‍वराचे चिंतन करताना सिगारेट पिली तर चालेल का? त्यांनी उत्तरादाखल नकार दिला. पहिल्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते, तो म्हणाला मी पण हेच विचारले, फक्त थोडासा फरक केला, तो असा की तू विचारले की ईश्‍वराचे चिंतन करताना सिगारेट पिली तर चालेल का? आणि मी विचारले सिगारेट पिताना ईश्‍वराचे चिंतन केले तर चालेल का? किती मजेशीर आहेना घटना !

तुम्ही आपलं म्हणणं कसं मांडता या वर काय उत्तर मिळणार हे अवलंबित असते. किंबहुना आपल्या प्रश्‍नातच बऱ्याचदा मिळणारी उत्तरं दडलेली असतात, आपल्याला जे हवे आहे ते समोरच्याने स्वतः होऊन आपल्याला द्यावे अशी परिस्थिती निर्माण करणे ही खरी संवाद कला, यातच खरे कौशल्य.

इथं एक शेर आठवतो,
कौनसी बात
कब कहॉं कैसे कही जाती हैं,
यह सलीका हो
तो हर बात सुनी जाती हैं।

बालवाडीच्या विद्यार्थ्यापासून तर राष्ट्राध्यक्षांपर्यंत साऱ्यांचा मेळ बसतो तो सुसंवादाने, जर ते नाही जमलं की तक्रारी सुरू होतात आणि मग पालक म्हणतात मुलं ऐकत नाही, नेते म्हणतात कार्यकर्ते ऐकत नाही, शिक्षकांचं विद्यार्थी ऐकत नाहीं. पण खऱ्या अडचणीकडे सहसा कोणाचे लक्ष जात नाही. खरी मेख इथंच आहे, आपलं म्हणणं संबंधितांपर्यंत नीट पोहोचलं की नाही हे आपण तपासतच नाही, अन्यथा सारं काही चुटकी सरशी सुटू शकतं. लक्षात असू द्या की जीवनात असलेली समस्या योग्य शब्दांत मांडता आली म्हणजे ती सोडवण्यात पन्नास टक्के यश मिळालं समजा.

कुरुक्षेत्री रणांगणात गलितगात्र झालेल्या अर्जुनाशी श्रीकृष्णाने साधलेला संवाद त्याला उभारी देण्यास समर्पक ठरला, त्याने युद्ध जिंकले, पुढं तेच तत्वज्ञान गीता बनून लोकांपर्यंत पोहोचले, कृष्णाने साधलेल्या सुयोग्य संवादामुळे जय शक्‍य झाले.

संवाद साधण्याआधी संबंधित विषयातील स्वतःच्या संकल्पना स्पष्ट असणे गरजेचे. कारण जी गोष्ट आपण सरळ साधेपणाने समोरच्याला समजवू शकत नाही याचाच अर्थ ती गोष्ट आपल्यालाही समजलेली नाही. लक्षात घ्या जे आपण समजावतो ते संवाद नव्हे तर समोरचा जे समजतो तो खरा संवाद, शिष्टाई, वाटाघाटी,प्रार्थना, समुपदेशन हे सारे काही सुसंवादाचेच वेगवेगळे प्रकार होय. दोन राष्ट्रांतील समस्या असो वा राज्या राज्यातील प्रश्‍न साऱ्या लहान मोठ्या विषयांना हाताळण्याची किमया यातूनच जन्माला येते. संवाद हे नाते बळकट करण्याचौ कोनशीला आहे.

समर्थ रामदासांची व्याख्याही याला साजेशी आहे, ते म्हणतात…
‘जगामध्ये जगमित्र,
जिभेपाशी आहे सूत्र’

ज्याचे बोलणे सौम्य, ह्रदयात झिरपणारे, आशयघन, मुद्देसूद आणि आठवणीत ताजे राहणारे आहे अश्‍या व्यक्तीस जगात काहीही अशक्‍य नाही. अशी व्यक्ती संभाव्य समस्यांचे समाधान सहज शोधू शकते. अनेक प्रश्‍नांची उकल करू शकते. गैरसमज संपवू शकते. आपणही या मार्गाचा स्विकार करायला हवा. ध्यास घ्यायला हवा. सराव करायला हवा. धडपड करायला हवी.

– सत्येन्द्र राठी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)