विविधा : गिरीजा कीर

माधव विद्वांस

मासिकातील लेखनामुळे प्रसिद्धी पावलेल्या ज्येष्ठ लेखिका गिरीजा कीर यांचे आज अभीष्टचिंतन. एक जमाना असा होता वृत्तपत्र स्टॉलवर वर्तमानपत्राबरोबर मासिके पाक्षिकांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असे. वाचक नवीन अंकांची उत्सुकतेने वाट पाहात असत. पोस्टमनची पिशवी वार्षिक वर्गणीदारांच्या मासिकांनी जड झालेली असे. या मासिकातूनच अनेक लेखकांनी आपले लेखन सुरू केले. 25 वर्षापूर्वीच्या वाचकपिढीत मासिक ही संकल्पना अतिशय लोकप्रिय होती आणि या मासिकातून ज्या ज्या लेखकांचे लेख अथवा कथा प्रसिद्ध झाल्या ते लेखक, लेखिका त्या काळात अतिशय लोकप्रिय ठरल्या. त्यावेळी मासिकातून कथामालिका लोकप्रिय होत होत्या. “पुढील भाग पुढच्या अंकात…’ असे कथेच्या शेवटी असायचे व वाचक पुढील अंकाची प्रतीक्षा करायचे.अशा मासिकात लोकप्रिय लेखकातील एक नाव म्हणजे गिरीजा उमाकांत कीर. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1933 रोजी धारवाड येथे झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माहेरचे नाव रमा नारायणराव मुदवेडकर. मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी मिळविल्यानंतर गिरिजाबाईंच्या लेखनाला सुरुवात झाली. किर्लोस्कर, प्रपंच, ललना इ. मासिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या.गिरीजाबाईंनी विविध वाङ्‌मय प्रकारांत आपले लेखन केले. त्यांची एकूण 78 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णने, बालसाहित्य आहे. वर्ष 1968 ते 1978 या काळात “अनुराधा’ मासिकाच्या सहाय्यक संपादक म्हणूनही त्यांनी काम केले. सामाजिक प्रश्नांसंबंधी त्या जागृत होत्या त्यामुळे त्यांनी कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांची वस्ती आणि आदिवासी भागात जाऊन त्यांच्या जीवनाचा अभ्यास केला.त्यांचे पुष्कळसे लिखाण या अनुभवातूनच लिहिले गेले आहे.

“जन्मठेप’ हे पुस्तक यांनी येरवड्यात जाऊन तेथे दीर्घकाळ तुरुंगवासात असलेल्या कैद्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या भावना जाणून लिहिले आहे. त्यांनी लिहिलेल्या “गिरीजाघर’, “देवकुमार’, “चांदण्याचं झाड’, “चंद्रलिपी’, “चक्रवेध’, “स्वप्नात चंद्र ज्याच्या’, “आभाळमाया’, “आत्मभान’, “झपाटलेला’ इ. कादंबऱ्यांही खूप लोकप्रिय झाल्या. त्यांच्याकडे वक्‍तृत्व हा पण गुण असल्याचे 2000 चे वर कथाकथनांचे कार्यक्रमही त्यांनी केले. परदेशातही जाऊन त्यांनी कथाकथन केले. चार वर्षांपूर्वी कोकण मराठी साहित्य परिषद-वांद्रे शाखा आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमात प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल कीर यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्या वेळी कीर म्हणाल्या, जीवनात मला अनेक अनुभव आले आणि मनामनाशी नाती जोडली गेली. तसेच जीवनात भेटलेल्या विविध माणसांनी माझे कथाविश्‍व आणि लेखणी समृद्ध झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)