भेगाळलेल्या जमिनी पाहून छातीत धस्स होतं ; शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंचा भावुक संदेश !

मुंबई: अनवाणी पायाने मुंबईत शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला वर्ष झाले तरी अद्यापही किसान मोर्चाच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा अखिल भारतीय किसान सभा आक्रमक पवित्र्यात आहे. गुरुवारी नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्यात आला असून हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला. सुमारे साडेसात हजार आदिवासी शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत किसान सभेच्या शिष्टमंडळाने बुधवारी रात्री तब्बल दीड तास चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली. सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन महाजनांनी दिले. परंतु, शेतकरी लेखी आश्वासनावर ठाम आहेत. दरम्यान, मोर्चातील वाहने मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहेत. त्यामुळे मुंबई नाका परिसरात वाहतूक कोंडी, बारावी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थांचे हाल होण्याची शक्यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचेनेते आणि विधिमंडळाचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे एक भावुक संदेश लिहून शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला आहे.

माझ्या प्रिय,
शेतकरी बांधवांनो

खेड्या-पाड्यात राहणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांचा आवाज सत्तेत असलेल्या शेठ लोकांपर्यंत पोहोचतच नाही. त्यांमुळे घामात भिजलेले, कष्टाने काटकुळे झालेले त्यांचे देह मागच्या वर्षी आपल्या न्याय हक्कासाठी मुंबईत पायी आले होते. ऊनाचे चटके सहन करत, काट्याकुट्यातून मार्ग काढत रक्ताळलेले पाय मुंबईत आले खरे, पण या सरकारला अद्याप पाझर फुटलेले नाही. नेहमीप्रमाणे आश्वासनांची खैरात करत तुम्हाला रिकाम्या हातीच माघारी पाठवले.

आज पुन्हा त्याच मागण्या घेऊन, तुमचे थकलेले देह नाशिकहून मुंबईकडे निघाले आहे. घरं ओस पडत आहेत, शेत पेरणीसाठी आपल्या मालकाची वाट बघतायत, बैल जोड गोठ्यात दिवस काढतेय…आपल्या बापाने जीवाचं बरं-वाईट करून घेऊ नये या धास्तीत शेतकऱ्यांची मुलं एक-एक दिवस लोटतायत. मात्र माझा शेतकरी सहजासहजी हार मानणाऱ्यातला नाही. जमवलेली तुटपूंजी रक्कम घेऊन, शिळी भाकर गाठोड्यात बांधून या शेठ लोकांपर्यत त्याचा खोल गेलेला आवाज पोहोचावा म्हणून मुंबईत येतोय. जगाच्या पोशिंद्याला नाईलाजाने सत्तेत मशगूल असलेल्या लोकांची हाजीहाजी करावी लागतेय. ही गोष्ट जीवाला लागतेय. माझ्या शेतकऱ्याचा हा अपमान आहे. मराठवाड्यातही आज भीषण परिस्थिती आहे. भेगाळलेल्या, भकास जमिनी पाहिल्या की छातीत धस्स होतं. शेतकऱ्याच्या पोटी जन्म नकोच, असे वाईट विचार मनाला शिवतायत. मराठवाड्याचा सुपूत्र, तुमचा लेक, तुमचा भाऊ, तुमचा मित्र या नात्याने मी तुमच्या आंदोलनास पाठिंबा पाठवत आहे. तुमच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी मी स्वत: लढा देईन. या सरकारला झुकवल्याशिवाय आपण आता शांत बसायचं नाही. आता नडायचं…

तुमचा,
धनंजय मुंडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)