श्रध्दा आणि सबुरी (अग्रलेख)

अनेक वर्षांची परंपरा मोडत बिंदू आणि कनकदुर्गा या दोन महिलांनी केरळच्या शबरीमला मंदिरात प्रवेश केला. समानतेच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या आणि मंदिर प्रवेशासाठी आग्रही असणाऱ्या महिला संघटनांत यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. ज्या मंदीराचे द्वार गेली अनेक शतके त्यांच्यासाठी परंपरवाद्यांनी बंद केले होते, ते अखेर त्यांच्यासाठी उघडले गेले. ही जशी एक बाजू आहे, तशीच या विषयाला दुसरीही बाजू आहे. ती म्हणजे मंदीर प्रवेशाच्या या घटनेचे त्याच व सलग दुसऱ्या दिवशीही केरळमध्ये हिंसक पडसाद उमटले. जाळपोळ, दगडफेकीचे प्रकार सुरू झाले असून त्यात 31 पोलिसांसह शेकडो जण जखमी झाले आहेत. या हिंसाचारात एका व्यक्तीला आपल्या प्राणासही मुकावे लागले आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर एक मुद्दा प्रकर्षाने समोर येतोय, तो म्हणजे श्रध्दा आणि सुुबरी.

या दोन्ही गोष्टी एकाच वेळी असल्या शिवाय समाजात परिवर्तन घडणार नाही, हेच या सगळ्या प्रकारांत अधोरेखित झाले आहे. भारतात अशी अनेक मंदीरे आहेत की त्यांनी भाविकांसाठी काही नियम बनवले आहेत. महिला असो वा पुरूष, हे नियम सगळ्यांना पाळावे लागतात व ते पाळलेही गेले. कधी श्रध्देने तर कधी भीतीने तर कधी आपले पूर्वज अथवा कुटुंबातले ज्येष्ठ लोक सांगतात, तर नको तो आगाऊपणा करायला म्हणून सांगितलेल्या गोष्टी केल्या गेल्यात. त्यात कोणाचा मोठेपणा अथवा कोणाला भेदभावाची वागणूक असा मुद्दा अगदी गेल्या दशकापर्यंत चर्चेलाही नव्हता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बदलत्या वातावरणात तो चर्चेला घेतला गेला. त्याला कारण शिक्षणामुळे शिकला-सवरलेला-शहाणा झालेला समाज. प्रश्‍न विचारायचे नसतात हे सांगण्याचा वा ऐकण्याचा काळ मागे पडला. मुली-महिलाही शिकल्या. प्रत्येक गोष्ट स्वत:ला सिध्द करून भांडून- झगडून त्यांनी प्राप्त केली. जी दारे त्यांच्यासाठी बंद होती, ती त्यांनी स्वकर्तृत्वाने उघडली वा उघडायला लावली. शबरीमलाही त्यापैकीच एक. भगवान अय्यपाचे हे मंदिर. दहा ते 50 वयोगटातील महिलांना या मंदिरात दर्शनासाठी प्रवेश बंदीची जुनी प्रथा येथे पूर्वापार चालत आलेली. ती मोडण्याचा काही महिला संघटनांनी निर्धार केला. मात्र परंपरांची अभेद्य भिंत पाडण्यात त्यांना अपयश आले.

प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने अपेक्षित असाच निकाल देत समानतेची बाजू उचलून धरत महिलांवरील प्रवेश बंदी उठवली. देशातल्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यावर विषय खरेतर येथेच संपायला हवा होता. मात्र तसे झाले नाही व एका रात्रीत किंवा पंधरवड्यात तसे होणे शक्‍यही नव्हते. कोणताही बदल घडून होण्यासाठी अगोदर तो मनापासून स्वीकारावा लागतो. किमान बदलण्याची तयारी तरी करायला हवी असते. त्याकरता काही काळ जाउ द्यावा लागतो. त्यात एखाद्या विषयाचा पगडा जर अत्यंत घट्ट असेल व अनेक शतकांपासून जर ती परंपरा चालत आली असेल तर त्यात काही बदल करणे तर दूरच; बदलाचे वारेही त्या ठिकाणी वर्ज्य असतात. त्यात कोणाचा हेकेखोरपणा अथवा स्वार्थ नसतो, तर परंपरा मानणाऱ्यांची जडणघडणच तशी झालेली असती.

तथापी, लोकांच्या आणि लोकांशी संबंधीत एखाद्या विषयाला जेव्हा वाचा फुटते तेव्हा त्याचा लाभ उचलण्यासाठी राजकीय जमात पुढे सरसावते. त्यांच्या विचारधारेचा, त्यांना धर्माबद्दल असलेल्या कथित आकलन आणि समजेचा ते प्रखर मारा करतात. त्यात एखाद्या धार्मिक विचारधारेशी बांधील असलेला पक्ष बदलाची कास न धरता जुनेच कवटाळून बसण्याचे पुण्यकर्म करतो व त्यांच्या मागे येणाऱ्यांनाही तसेच करायला लावतो. वास्तविक शबरीमला प्रकरण असो अथवा अन्य कोणतेही मंदीर, हिंदू धर्माने वेळोवेळी वेगवेगळे बदल स्वीकारले आहेत. अनेकविध प्रवाह आपल्यात सामावून घेतले आहे व स्वत:ला अधिक प्रगल्भ आणि समावेशक करून घेतले आहे. धर्माचे हे बदल स्वीकारण्याचे मोठेपण आणि परंपराच त्याच्या श्रेष्ठत्वाचे व चीरकाल टिकण्याचे लक्षण आहे.

मात्र वर उल्लेख केल्याप्रमाणे राजकीय वाऱ्यांचा जेव्हा धार्मिक बाबतींत शिरकाव होतो, तेव्हा लोकांची समज विकसित करण्याऐवजी, संकुचित करण्यातच अधिक धन्यता मानली जाते व ज्या गोष्टी प्रगतीशील आहेत त्या मागे दामटत त्याज्य असणाऱ्या बाबींनाच सर्वाधिक महत्व बहाल केले जाते. सर्वसमभाव किंवा धर्मनिरपेक्ष विचारधारा मानणारा आणखी एक वर्गही राजकारणात आहे. किमान त्यांनी तरी शबरीमला प्रकरणात समंजस भूमिका घेणे अपेक्षित होते. मात्र त्यांनीही स्थिती “जैसे थे’ ठेवण्याच्या; अर्थात महिलांना प्रवेशबंदीच्या बाजूनेच कौल देण्यात धन्यता मानली.

राजकीय पक्षांना एक मर्यादा असते. त्यांना दूरगामी लाभाचा वा तोट्याचा विचार करून अनुननयाची भूमिका घ्यावीच लागते. तथापी, या आणि अशा प्रकरणांत नागरिकांची भूमिका मात्र अशी इतकी उथळ असता कामा नये. सर्वोच्च न्यायालयाने महिलांना प्रवेश देण्याबाबत दिलेला निर्णय केरळ सरकारच नव्हे, तर केंद्र सरकारलाही बंधनकारक आहे. त्याचे यथायोग्य पालन होणे वा करायला लावणे, हे त्यांचे घटनात्मक कर्तव्य आहे. मात्र महिलांनी वा त्यांच्या संघटनांनीही याकडे डोळसपणे बघायला हवे.

श्रध्दा असल्यामुळेच मंदिरात जाण्याची त्यांची इच्छा आहे हे मान्य, पण त्याचवेळी कायद्याच्या बडग्याने दारे खुली होण्याऐवजी विरोध करणाऱ्यांच्या मनाची दारे खुली करण्यासाठी त्या निश्‍चितच प्रयत्न करू शकतात. मघाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या धर्माने अनेक विचार आणि प्रवाह स्वीकारले आहेत व आत्मसातही केले आहेत. हा नवा बदलही स्वीकारला जाणारच आहे. त्याकरता सबुरी तेवढी ठेवायला हवी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)