अनधिकृत बांधकामांना रोखण्याचा निश्‍चय

पुणे – शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांना पायबंद घालण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून स्वतंत्र सेल (कक्ष) सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. या माध्यमातून स्वतंत्र कर्मचारी नेमून कारवाईसह अशा बांधकाम करणाऱ्यांवर तातडीनं गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी देण्यात येणार असून त्यासाठी महापालिका आयुक्तांकडे स्वतंत्र मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे. p

कोंढवा आणि आंबेगाव दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेकडून सध्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी घरपाडी विभाग तसेच अतिक्रमण नियंत्रण विभागाच्या माध्यमातून कारवाई केली जाते. यामुळे कारवाईचे नियोजन करताना तिन्ही विभागांचा समन्वय साधून ही कारवाई केली जाते. तर घरपाडी विभागाकडे अतिक्रमणविरोधी कारवाईचीही जबाबदारी आहे. ही बाब लक्षात घेऊन अनधिकृत बांधकामे तसेच बांधकाम करण्यात येणाऱ्या ठिकाणी सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र सेल कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहराची वाढलेली हद्द, नव्याने समाविष्ट झालेली 11 गावे या ठिकाणी असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी स्वतंत्र सेल स्थापन करण्यात येणार असून या सेलकडून संबंधित बांधकाम मालकांना नोटीसा बजावणे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. त्यासाठी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी नुकतेच महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र पाठवत त्यांच्याकडून या सेलसाठी अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केली आहे.

प्रभावी कारवाई होणार का?
कोंढवा, आंबेगाव यांसारख्या घटना यापूर्वीही घडल्यानंतर महापालिकेकडून शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे तसेच इतर प्रकारच्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत. मात्र, नागरिक घटना विसरून जाईपर्यंतच या कारवाया होत असल्याचे यापूर्वी अनेकदा निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कामासाठी स्वतंत्र कर्मचारी दिला, तरी त्यांच्याकडून प्रभावी काम होणार की वसुलीसाठी आणखी एक नवा कक्ष तयार होणार? याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)