गौतम चाबुकस्वार यांना शिवसेनेकडून संधी धुसर
तिसऱ्यांदा संधी मिळणार का?
अण्णा बनसोडे यांना राष्ट्रवादीने यापूर्वी दोनवेळा संधी दिली आहे. प्रचंड विरोध असतानाही हमखास निवडून येणारा उमेदवार म्हणून बनसोडे यांना 2014 साली संधी देण्यात आली होती. मात्र अतिआत्मविश्वास नडल्याने त्यांचा पराभव झाला होता. यावेळी होणारी चौरंगी लढत, राष्ट्रवादीकडे असणारी इच्छुकांची संख्या यामुळे बनसोडे यांना राष्ट्रवादी संधी देईल का याबाबत साशंकता व्यक्तहोत आहे.
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील विधानसभेच्या तीन मतदारसंघापैकी राखीव असलेल्या पिंपरी मतदारसंघासाठी यावेळी सर्वच पक्षांत इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. सर्वांनीच निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी चालविल्याने या मतदारसंघात बंडखोरी होणार हे निश्चित मानले जात आहे. विशेष बाब म्हणजे हा मतदारसंघ सध्या शिवसनेकडे असून या मतदारसंघावर भाजपाने दावा केल्यामुळे युतीच्या वाटणीत मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत.
शहरातील तीन मतदारसंघापैकी मतदारसंख्येमध्ये पिंपरी हा सर्वांत लहाण मतदारसंघ. त्यातच या मतदारसंघात राखीव असल्याने तसेच चाळीसहून अधिक झोपडपट्ट्या असल्याने नेहमीच हा मतदारसंघ चर्चेत राहिला आहे. सन 2009 साली झालेल्या मतदारसंघ पुर्नरचनेत पिंपरी हा नव्याने अस्तित्त्वात आलेला मतदारसंघ शिवसेना आणि भाजपाच्या युतीमध्ये हा मतदारसंघ पुर्वी भाजपाकडे होता. मात्र 2014 साली युती न झाल्याने स्वतंत्रपणे शिवसेना आणि भाजपा लढली असली तरी भाजपाने हा मतदारसंघ रिपाईला सोडला होता.
रिपाईच्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी चांगली लढत दिल्यामुळे आजही या मतदारसंघावर रिपाई दावा करत आहे. तर 2009 मध्ये जागावाटपात भाजपाकडे हा मतदारसंघ असल्याने भाजपा नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून सध्या मतदारसंघा शिवसेनेचा आमदार असल्याने नेमका कोणत्या पक्षाकडे हा मतदारसंघ जाणार याबाबत दावे-प्रतिदावे सुरू आहेत.
शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार हे सध्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करीत असले तरी त्यांना शिवसेनेकडून पुन्हा संधी मिळण्याची आशा धुसर आहे. माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी चांगलीच फिल्डींग लावली आहे. मात्र, बारणे यांच्या विजयावरच त्यांचे भविष्य अवलंबून आहे. तर शिवसेनेचे युवराज दाखले यांनीही निवडणुकीसाठी बिगुल वाजविले आहे. भाजपाकडून पिंपरीसाठी सर्वांत जास्त इच्छुकांची गर्दी आहे. यामध्ये खासदार अमर साबळे यांच्या कन्या वेणू साबळे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, नगरसेविका सीमा सावळे, माजी नगरसेवक भीमा बोबडे यांनी जोरदार तयारी चालविली आहे.
मतदारसंघाबाबत खात्री नसतानाही भाजपाच्या अनेकांनी शड्डू ठोकल्याने चुरस वाढली आहे. राष्ट्रवादीतही इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सुरुवातील केवळ माजी आमदार अण्णा बनसोडे हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असे बोलले जात असताना नगरसेविका सुरक्षणा शिलवंत-धर यांनीही तयारी चालविली आहे. बारामतीकडूनच त्यांना तयारी करण्याबाबत सांगण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनीही राष्ट्रवादीच्या तिकीटासाठी फिल्डींग लावल्याने बनसोडे यांचा पत्ता गुल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रिपाईचा पिंपरीवरील दावा, चंद्रकांता सोनकांबळे यांनी गतवेळी दिलेली चांगली लढत यामुळे त्यादेखील पुन्हा या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यातच वंचितही आपला उमेदवार देणार हे निश्चित असल्याने मतदारसंघात चुरशीची लढत पहावयास मिळणार आहे. प्रत्येक पक्षाकडे असलेले एकापेक्षा अधिक इच्छुक, युतीत जागावाटावरून निर्माण होणारी संभाव्य दरी आणि बंडखोरी यामुळे चौरंगी लढत या मतदारसंघात पहावयास मिळणार आहे.
वंचित आघाडीला आयता उमेदवार
सर्वच प्रमुख पक्षात भाऊगर्दी असल्याने तसेच शिवसेना आणि भाजपापैकी एकाच पक्षाकडे हा मतदारसंघ युतीमध्ये राहणार आहे. त्यामुळे ज्या पक्षाला मतदारसंघ मिळणार नाही त्या पक्षाचा आयता उमेदवार वंचित बहुजन आघाडीला मिळणार हे आतापासूनच निश्चित आहे. राष्ट्रवादी, शिवसेना किंवा भाजपाकडून संधी न मिळालेला उमेदवारही वंचितकडून प्रस्थापितांना तगडी लढत देण्याची शक्यता आहे.