डेडलाइन देऊनही ठेकेदाराकडून रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीत

पाटण तालुक्‍यातील वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर; अपघात होण्याची शक्‍यता

पाटण  – तालुक्‍यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांची कामे सध्या अर्धवट अवस्थेत आहेत. बांधकाम विभागाने डेडलाइन देवूनही ठेकेदारांनी कामे अर्धवट स्थितीत ठेवली आहेत. परिणामी ग्रामीण भागातील वाहतूकीचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. या रस्त्यांच्या कामामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पाटण-मोरगिरी रस्त्यावर माणगाव या ठिकाणी मोरणा-गुरेघर मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी पाइपलाइनचे काम सुरू आहे. यासाठी रस्ता खोदण्यात आला आहे. मात्र ऐन पावसाळ्यात हे काम अर्धवट अवस्थेत असल्याने या ठिकाणची वाहतूक धोकादायक झाली आहे.खोदकाम केलेली माती रस्त्यावर टाकण्यात आल्याने पावसामुळे या ठिकाणी चिखल झाला आहे.

वाहने चिखलात अडकून पडल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पाटण-मोरगिरी मार्गावरील वाहतूक काही काळ बंद करावी लागत आहेत. यामुळे वाहन धारकांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. बांधकाम विभाग मात्र सुस्त आहे. अशीच अवस्था नाटोशी येथील इनामवाडी ते बौध्दवस्ती या ठिकाणी सुरू असलेल्या फरशी पुलाच्या बांधकामामुळे झाली आहे. फरशी पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असल्याने ओढ्याचे पाणी रस्त्यावर येवून वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण झाला. मात्र हेच काम ठेकेदाराने पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे होते.

कराड-पाटण या मार्गाला समांत्तर असणाऱ्या मोरगिरी, नाटोशी, मारूलहवेली या रस्त्यांवरील फरशी पुलांची कामेही अर्धवट अवस्थेत आहेत. उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला तरी ठेकेदारांनी संबंधित रस्त्यावरील कामे पूर्ण केली नाहीत. बेलवडे रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. तर पापर्डे गावाजवळील फरशी पुलावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. कोयना विभागातील हेळवाक पुलाची अवस्थाही गंभीर झाली आहे. या पुलावरील पडलेले खड्डे मोजणे कठीण झाले आहे. या पुलावरून जाणाऱ्या वाहनांचे पार्टस्‌ गोळा करण्याची वेळ वाहन धारकांवर आली आहे. आख्खा उन्हाळा झोपून काढणारा सार्वजनिक बांधकाम विभाग ऐन पावसाळ्यात जागा झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून या पुलावरील खड्डे भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. तालुक्‍यात ठिकठिकाणी रस्त्यांसह फरशी पुलांच्या बांधकामांची अवस्था दयनीय झाली आहे. अधिकारी व ठेकेदार यांच्या बेजबाबदार पणामुळे वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. येणाऱ्या आठ दिवसात तालुक्‍यातील प्रमुख रस्त्यांच्या कामाची दुरुस्ती न झाल्यास रस्त्यावर आंदोलन करण्याचा परिसरातील इशारा प्रवाशांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)