आमदारांना कार्यक्रमास डावलल्याने देसाई गटाचा सभात्याग

पाटण पंचायत समिती सभा; देसाई-पाटणकर सदस्यांत जोरदार खडाजंगी

पाटण  पाटण पंचायत समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या प्राथमिक शिक्षक पुरस्कार तसेच महिला मेळावा व लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला आमदार शंभूराज देसाई यांना आमंत्रित न केल्याने देसाई गटाच्या सदस्यांनी सभात्याग केला. यावेळी देसाई-पाटणकर गटांच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सभापती उज्वला जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची मासिक सभा सुरु झाली. कामकाजास सुरुवात झाल्यानंतर मल्हारपेठ गणातील देसाई गटाचे सदस्य सुरेश पानस्कर यांनी पंचायत समितीच्या कार्यक्रमांना आमदारांना डावलण्यात आल्याचे सांगून सत्ताधारी पंचायत समितीत राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सदस्य संतोष गिरी यांनी सत्ताधारी पंचायत समितीच्या निधीचा राजकारणासाठी वापर करत असल्याचा गंभीर आरोप केला.

शासकीय कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींना डावलण्यात येते ही चुकीची बाब आहे. त्यावर उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी या अगोदर आ. शंभूराज देसाई यांना पंचायत समितीच्या कार्यक्रमांना निमंत्रण देत होतो. मात्र, त्यांच्याकडून या कार्यक्रमांमध्ये राजकीय वक्‍तव्य होऊ लागल्याने निमंत्रण देण्याचे बंद केले, असा खुलासा केला. यावरुन जोरदार खंडाजंगी झाली. तुम्ही तुमच्याच नेत्यांना कसे काय बोलवता असा सवाल करताच शेलार यांनी पाटण पंचायत समितीत राष्ट्रवादीची सत्ता आहे. हे कळायला तुम्हाला दोन वर्षी लागली, असा चिमटा घेतला.

अखेर देसाई गटाच्या सदस्यांनी सभात्याग करत सभागृहातून बाहेर जाणे पसंत केले. ऐनवेळच्या विषयात बोलताना राजाभाऊ शेलार यांनी सभात्याग केलेल्या सदस्यांबद्दल नाराजी व्यक्‍त केली. विरोधी सदस्यांनी आम्हाला दोन वर्षे चांगले सहकार्य केले. तालुक्‍यात पाणीटंचाई सारखे गंभीर विषय असताना त्यांनी नको त्या विषयासाठी सभात्याग करणे योग्य नाही. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीचे निमंत्रण सर्व सदस्यांना देण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला त्यांनी हजर असणे गरजेचे होते. मात्र ते हजर राहिले नाहीत. त्यामुळे लोकनेत्यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. इथून पुढे चांगले काम करण्याची सद्‌बुध्दी देवाने त्यांना देवो अशी अपेक्षा व्यक्‍त केली.

शासकीय कार्यक्रमांना कर्मचाऱ्यांना गोळा करुन कार्यक्रम घेणे हे योग्य नाही. दहा मार्चला लोकनेते बाळासाहेब देसाई यांची जयंती पंचायत समितीच्या वतीने साजरी करण्यात येते. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून आ. शंभूराज देसाई यांना कार्यक्रमाला बोलविणे गरजेचे होते. त्यांना निमंत्रण देण्यात आले नाही. पंचायत समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या कोणत्याच कार्यक्रमांना आमदारांना बोलविण्यात आले नाही. सत्ताधारी पंचायत समितीच्या कारभारात राजकारण होत आहे. सरकारी पैसे खर्च करुन राजकीय कार्यक्रम केले जात आहे.

– पंजाबराव देसाई, गटनेते शिवसेना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)