मलकापूरला उपनगराध्यक्ष, स्वीकृतसाठी आज निवड

कराड – मलकापूर नगरपरिषद निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. यासाठी शनिवार, दि. 16 रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रांताधिकाऱ्याकडे दोन जागांसाठी एकूण 9 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये कॉंग्रेसचे पाच तर भाजपाचे चार अर्ज असल्याने कॉंग्रेस व भाजपानेही स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी ताकद लावल्याचे दिसून येत आहे. नगरपरिषदेच्या सोमवारी होणाऱ्या विशेष सभेत या निवडी जाहिर केल्या जाणार आहेत.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी कॉंग्रेसकडून नुरजहॉं मुल्ला, आनंदराव सुतार, अल्लाउद्दीन मुल्ला, अमर इंगवले, सागर जाधव यांनी तर भाजपाकडून सारीका गावडे, प्रमोद शिंदे, अरुण यादव, रणजित थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

नव्याने स्थापन झालेल्या मलकापूर नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपाचा पराभव करुन कॉंग्रेसची निर्विवाद सत्ता आली. निवडणुकीनंतर आता उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवडी सोमवारी होत आहेत. दरम्यान, मनोहर शिंदे यांचे नाव उपनगराध्यक्ष पदासाठी नक्की मानले जात असून स्वीकृत नगरसेवक पदावर कोणाची वर्णी लागते? भाजपाला स्वीकृतची संधी मिळते का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम नूतन नगराध्यक्षा निलम येडगे यांनी जाहिर केला आहे. त्यानुसार मलकापूर नगरपरिषदेची विशेष सभा सोमवार, दि. 18 रोजी दुपारी 12.30 वाजता मुख्य प्रशासकीय इमारतीत आयोजित करण्यात आली आहे. स्वीकृत नगरसेवक निवडी नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत. त्यासाठी इच्छुकांनी आपले अर्ज शनिवार, दि. 16 रोजी प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांच्याकडे दाखल केले.

कॉंग्रेसकडून पाच तर भाजपाकडून चार अर्ज दाखल झाले आहेत. दाखल अर्जांची छाननी प्रांताधिकाऱ्यांनी करुन स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे जाहिर केली. प्रत्यक्ष निवडीची प्रक्रिया नगराध्यक्षा तथा पिठासन अधिकारी निलम येडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दुपारी 1.30 वाजता नोंदणीकृत प्राप्त पक्षाच्या संख्याबळाच्या प्रमाणात उमेदवारांची नावे नगरसेवक म्हणून जाहिर करणार आहेत. दरम्यान, सकाळी 10.30 ते 12.30 यावेळेत उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज मुख्याधिकाऱ्यांकडे दाखल केला जाणार आहे. एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास हात उंचावून मतदान केले जाणार आहे. निवडीचे व्हिडीओ चित्रिकरणही केले जाणार आहे. या निवडीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)