डिपॉझिट गमावणाऱ्यांची भाऊगर्दी

निवडणुकीत हार-जीत तर होतच राहते; परंतु पराभवामध्ये दोन प्रकार आहेत. यातील दारुण पराभवापेक्षाही भयंकर असते ते डिपॉझिट म्हणजे अनामत रक्‍कम जप्त होणे. कारण अशा प्रकारे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर किमान निर्धारित मतेही न मिळाल्यामुळे अनामत रक्‍कम जप्त झाल्यास उमेदवाराच्या दृष्टीने ती लाजिरवाणी बाब ठरते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एकूण वैध मतांच्या सहा टक्‍के मतेही न मिळवणाऱ्या उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त केली जाते. लोकसभेच्या निवडणुकांसाठी खुल्या गटातील उमेदवारांसाठी 25 हजार, तर आरक्षित उमेदवारांसाठी 12500 रुपये रक्‍कम अनामत म्हणून घेतली जाते.

आजवरच्या लोकसभा निवडणुकांमध्ये देशात अशा प्रकारे किती जणांची अनामत रक्‍कम जप्त झाली आहे, यांची आकडेवारी सादर करण्यात येते. त्यानुसार 1952 मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी 40 टक्‍के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. या निवडणुकीत एकूण 1874 उमेदवार रिंगणात उतरले होते. यापैकी 745 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. यानंतरच्या म्हणजे 1957 च्या निवडणुकीत 1519 उमेदवार उभे होते, त्यापैकी 494 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. 1962 मध्ये झालेल्या निवडणुकीतील 1985 उमेदवारांपैकी 856 उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली. 1967 मध्ये 2369 उमेदवार रिंगणात होते त्यापैकी 1203 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

1971 मध्ये उमेदवारांची संख्या जशी वाढली तशीच डिपॉझिट जप्त झालेल्यांची संख्याही वाढली. या निवडणुकांमध्ये 2784 उमेदवार रिंगणात होते त्यापैकी 1707 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. 1977 मध्ये 2439 उमेदवारांपैकी 1356 जणांचे, 1980 मध्ये 4629 उमेदवारांपैकी 3417 जणांचे डिपॉझिट जप्त झाले. या सर्वांवर कडी झाली ती 1984-85 मध्ये. या निवडणुकांमध्ये 80 टक्‍के उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली. 5492 उमेदवारांपैकी 4382 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. यानंतर 1998 पर्यंत ही टक्‍केवारी वाढत गेली.

1989 मध्ये 81 टक्‍के उमेदवारांचे, 1991-92 मध्ये 86 टक्‍के उमेदवारांचे तर 1996 मध्ये 91 टक्‍के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. 1996 मध्ये 13952 उमेदवार रिंगणात होते त्यापैकी 12688 उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली. 1998 मध्ये 4750 उमेदवारांपैकी 3486, 1999 मध्ये 4648 पैकी 3400, 2004 मध्ये 5435 पैकी 4218 आणि 2009 मध्ये 8070 उमेदवारांपैकी 6829 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)