पांडुरंग पालखीचे श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान

पंढरपूर (प्रतिनिधी) – टाळ, मृदुंगाचा गजर व हरीनामाचा जयघोष करीत श्री संत मुक्ताबाईंच्या 722व्या अंतर्धान समाधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याने आज (सोमवार) दि.27 मे रोजी सकाळी 7 वाजता श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान ठेवले. पहिल्या मुक्कामासाठी सायंकाळी हा सोहळा औरंगाबाद मुक्कामी विसावला.

सोमवारी पहाटे श्री विठ्ठल रूक्‍मिणी मंदिरे समितीचे विश्वस्त माऊली जळगावकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल पादुकांची विधीवत पूजा करण्यात आली. श्री संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी श्री पंढरीनाथ परमात्मा पांडुरंग यांच्या पादुकांचे मुक्ताईनगरकडे प्रस्थान झाले.

श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे विश्वस्थ हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, शकुंतला नडगिरे, श्री संत मुक्ताई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील, जयवंतराव महल्ले, सुनंदा महल्ले, मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख हभप रवींद्र महाराज हरणे, माजी आमदार सुधारकपंत परिचारक, पालखी सोहळा प्रमुख-अध्यक्ष सुर्यकांत भिसे, विशाल महाराज खोले, ज्ञानेश्वर हरणे आदी उपस्थित होते.

पांडुरंगाच्या पादुका विठ्ठल मंदिरातून रखुमाई मंदिरात नेण्यात आल्या. तेथे पादुकांची पूजा होवून मंदिरे समितीचे विश्वस्त माऊली जळगावकर यांनी या पादुका ऍड. रविंद्र पाटील यांच्याकडे सुपूर्द केल्या. या पादुका सभामंडपात ठेवण्यात आलेल्या पालखीमध्ये ठेवल्या. त्यानंतर श्री विठ्ठल रूक्‍मिणी मंदिरे समितीच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व हा सोहळा करमाळ्याकडे मार्गस्थ झाला.

नगरमध्ये फटाक्‍यांची आतषबाजी
श्री पांडुरंगाचा पालखी सोहळा नगर येथील दिल्ली गेटजवळ पोहोचल्यानंतर फटाक्‍यांच्या आतषबाजीत सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. तेथून भव्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी हा सोहळा नगर येथील श्री सिद्धेश्‍वर महादेव मंदिरात पोहोचला. येथे दुपारचा नैवेद्य व वारक-यांना भोजन देण्यात आले. विश्रांतीनंतर सोहळा औरंगाबादकडे मार्गस्थ झाला.
सायंकाळी श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे औरंगाबाद शहरामध्ये आगमन झाल्यानंतर सोहळ्याचे मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. गारखेडा येथील श्री गजानन महाराज संस्थानच्या संत गजानन महाराज मंदिरात पालखी सोहळा पोहोचल्यानंतर संस्थानसह भाविकांनी सोहळ्याचे स्वागत केले. समाज आरतीनंतर वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. रात्रौ. किर्तनाची सेवा झाल्यानंतर सोहळा येथे विसावला.

उद्या मंगळवार दि.28 रोजी सिल्लोड, जामनेरमार्गे हा सोहळा भुसावळ मुक्कामी पोहोचेल. येथे श्री पांडुरंग, संत नामदेव महाराज व निवृत्तीनाथांच्या भेटीचा सोहळा होईल. पालखी सोहळ्यामध्ये 100 वारकरी सहभागी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)