डेंग्यू रुग्णांत पुन्हा वाढ

साडेतीन हजार ठिकाणी आढळून आली डासांची उत्पत्तिस्थाने

पुणे – शहरातील डेंग्यूच्या डासांची पैदास वाढत असून आतापर्यंत साडेतीन हजार ठिकाणी डासांची उत्पत्तिस्थाने आढळून आली आहेत. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची भीती आहे. दरम्यान, ही उत्पत्तिस्थाने आणखी वाढण्याची शक्‍यता असून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्व सरकारी, खासगी कार्यलये, शाळा, महाविद्यालय, सोसायटी याठिकाणी सर्वेक्षण सुरू केले आहे.

मान्सूनपूर्व पावसाने शहरात हजेरी लावली. त्यानंतर शहराच्या विविध भागांत डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. त्याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डासांच्या उत्पत्तिस्थानाबाबत सर्वेक्षण सुरू करण्यात आले. त्यानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शहर आणि उपनगरांसह अन्य भागांत डासांची उत्पत्तिस्थाने शोधण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत अनेक भागांत झालेल्या सर्वेक्षणामध्ये सरकारी कार्यालये, निमसरकारी कार्यालय असलेल्या 1 हजार 307 सार्वजनिक ठिकाणी तर 2 हजार 107 खासगी ठिकाणी उत्पत्तिस्थाने आढळून आली.

सध्या शहरात 3 हजार 414 ठिकाणी डासांची उत्पत्तिस्थाने सापडल्याने आणखी ठिकाणांचा शोध सुरू आहे. उत्पत्तिस्थानांवर डासांच्या आळ्या सापडल्या असून त्या आळ्या कोणत्या जातीच्या अथवा कोणत्या डासाच्या प्रकाराच्या आहेत, याची तपासणी केल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

गेल्या वर्षी 12 हजार ठिकाणी आढळली उत्पत्तिस्थाने
गेल्यावर्षी पावसाळ्यात 15 हजार 299 खासगी ठिकाणी तर 5 हजार 776 सार्वजनिक अशा एकूण 21 हजार 75 ठिकाणी डासांची उत्पत्तिस्थाने आढळून आली आहेत. त्यापैकी 5 हजार 318 जणांना नोटीस देऊन त्यांच्याकडून 4 लाख 36 हजार 462 रुपयांचा दंड करण्यात आला असून यावर्षीही डासांच्या उत्पत्तिची ठिकाणे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

15 दिवसांत 8 लाख ठिकाणी धूर फवारणी
डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तिस्थानके वाढत असल्यामुळे प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे हा प्रादुर्भाव आणि उत्पत्तिस्थाने नष्ट करण्यासाठी आरोग्य विभागाकडून यावर्षी 1 ते 14 जूनपर्यंत शहराच्या विविध भागांतील 7 लाख 46 हजार 942 खासगी ठिकाणी सर्वेक्षणांतर्गत धूर फवारणी करण्यात आली आहे. तर 48 हजार 791 सार्वजनिक ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली. सर्वेक्षणादरम्यान 9 हजार 513 कुटुंबीय, सोसायट्यांनी धूर फवारणी करण्यास नकार दिला, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.