“नोटाबदली’चे भूत अजूनही मानगुटीवर

पाळेमुळे खोदणार कोण? : नोटाबंदीला दीड वर्षे होऊनही रॅकेट सक्रीय

– संजय कडू

-Ads-

पुणे – चलनातून बाद जवळपास तीन कोटींच्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या संगमनेरच्या नरगसेवकाला खडक पोलिसांनी नुकतीच अटक केली. नोटाबंदीनंतर अधिकृतपणे नोटा बदलण्याच्या मुदतीनंतर जवळपास वर्षभर काळ्या बाजारात टक्केवारीवर नोटा बदलून मिळत होत्या. मात्र, आता दीड वर्षानंतरही या नोटा बदलून मिळण्याची शक्‍यता नसताना एक विद्यमान नगरसेवक नोटाबदलीसाठी आल्याने पोलिसांनाही आर्श्‍चयाचा धक्का बसला होता. या पार्श्‍वभूमीवर काही बॅकिंग तज्ज्ञांनी “नेपाळ व भूतानमध्ये भारतीय चलन अजून चालत असून तेथून भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांमार्फत नोटा बदलल्या जात असाव्यात,’ अशी शक्‍यता व्यक्त केली जात आहे. यासाठी काही आंतरराष्ट्रीय टोळ्याही कार्यरत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र दुसरीकडे पोलिसांनी ही शक्‍यता फेटाळून लावत चलनातून बाद झालेल्या नोटा बाळगणाऱ्यांना ब्लॅकमेलिंग किंवा फसवण्याच्या उद्देशाने हे प्रकार अजूनही घडत असल्याकडे लक्ष वेधले आहे.

नोटाबंदीचा उद्देश साध्य झाला का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अचानक 500 व 1000 रुपये मूल्याच्या नोटा रद्द केल्याची घोषणा केली आणि त्यामुळे रातोरात सर्वसामान्य नागरिकांसह धनाढ्य, लब्धप्रतिष्ठित साऱ्यांचीच दाणादाण उडाली. नोटाबंदीच्या हेतूवर प्रतिक्रियाही आल्या आणि नोटांच्या टंचाईचा सामनाही नागरिकांना करावा लागला. देशात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी आणल्यानंतर अनेकांचा पैसा बाहेर आला. देशात सीमेपलीकडून खोट्या नोटा आणल्या जायच्या, ही एक गंभीर समस्या होती. हे थांबवण्यासाठी सरकारलादेखील मोठी यंत्रणा उभी करावी लागत होती. नोटाबंदीनंतर खोट्या नोटा चलनात येणार नाहीत, असे गृहीत धरून नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता.

…म्हणजे नोटा अजूनही दडवलेल्याच?
नोटाबंदीनंतर 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016 या कालावधीत कोणत्याही बॅंकेत अथवा पोस्ट कार्यालयात भरुन पर्यायी चलन प्राप्त करण्याची मुभा होती. त्यानंतर या नोटा 31 मार्च 2017 पर्यंत एक प्रतिज्ञापत्र भरुन रिझर्व्ह बॅंकेत जमा करता येत होत्या. या मुदतीत अनेकांनी नोटांचा भरणा केला तर ज्यांच्याकडे काळा पैसा होता, त्यांनी कर्मचारी, नातेवाईक तसेत काहींना कमिशनवर त्यांच्या खात्यात पैसा भरण्यास लावले होते. भ्रष्ट राजकारणी, उद्योजक आणि काळ्या पैसेवाल्यांना मोठी आर्थिक झळ बसली होती. या व्यक्ती जवळपास वर्षभर स्वत:च्या काळ्यापैशांची विल्हेवाट लावण्यासाठी धडपडत होते. मात्र, नोटा बदलाच्या मुदतीनंतर सर्व आशा मावळल्याने काहींनी नोटा अक्षरश: कचरापेटी, रस्त्याच्या कडेला आणि नदीपात्रात टाकल्या. या पार्श्‍वभूमीवर दीड वर्षांनंतर एका नगरसेवकाकडे चलनातून बाद झालेल्या तीन कोटींच्या नोटा सापडल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

…तर नोटा बदलण्यास अजूनही रांगा लागतील
या पार्श्‍वभूमीवर काही बॅंकिंग तज्ज्ञांशी चर्चा केली असता, “कायद्याच्या दृष्टीने एखाद्या व्यक्तीने चलनातून बाद 10 पेक्षा जास्त नोटा बाळगणे गुन्हा ठरतो. नोटाबंदीनंतर दीड वर्षांनी नोटा बदलून मिळतील हेही अशक्‍य वाटत आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणीही जुन्या नोटांची रद्दी विकत घेणार नाही. मात्र, नेपाळ, भूतान, श्रीलंका, बांगलादेश येथे जाऊन नोटांची अदलाबदल करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळ्या असल्याची शक्‍यता आहे. सरकारने जरी 99 टक्‍के बाद नोटा परत आल्याचा दावा केला, तरी काळ्या बाजारात त्याहीपेक्षा जास्त नोटा आहेत. आरबीआय अजूनही नोटांचा स्पष्ट हिशेब देऊ शकली नाही. सरकारने याक्षणी आणखी महिनाभराची मुदत नोटा बदलण्यासाठी दिली, तर नोटा बदलण्यासाठी पुन्हा रांगा लागतील. सर्वसामान्यांकडेही बाद पाच-दहा नोटा सहज सापडू शकतात,’ असे मत त्यांनी व्यक्‍त केले.

काय आहे “त्या’ नगरसेवकाचा दावा?
तीन कोटी रुपयांचे बाद चलन सापडलेल्या नगरसेवकाने पोलीस तपासात केलेल्या दाव्यानुसार, त्याने ही रक्‍कम फक्‍त 12 लाख रुपयांत विकत घेतली आहे. बाद झालेले तीन कोटी रुपये दलालाकडे दिल्यास तो त्या बदल्यात 18 लाख रुपये देणार होता. पण, मग हा दलाल या रकमेचे काय करणार होता, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे.

तांत्रिकदृष्ट्या चलनातून बाद नोटा बदलून मिळणे अशक्‍य आहे. मात्र, 12 लाख रुपये देऊन कोणी चलनातून बाद झालेली रद्दी विकत घेणार नाही. यामुळे याचाही विचार होणे आवश्‍यक आहे.
– विद्याधर अनास्कर, बॅंकिंग तज्ज्ञ.

संबंधित नगरसेवकाने या नोटा 12 लाखांत विकत घेतल्याचे सांगितल्यावर त्यादृष्टीने तपास सुरू आहे. त्याने ज्यांच्याकडून नोटा विकत घेतल्या, त्यांना चौकशीला बोलवण्यात आले होते. तसेच जो व्यक्ती चलनातून बाद झालेल्या नोटा घेण्यास येणार होता, तो फरार आहे. त्याच्याशी फक्त मोबाइलवर संपर्क झाल्याने प्रत्यक्षात त्याची माहिती यांच्याकडे नाही. नोटा बदलून देणारा सापडल्यास सर्व गोष्टींचा उलगडा होऊ शकतो
– राजेंद्र मोकाशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)