प्रभारी आगार प्रमुखांच्या बदलीची मागणी

ढिसाळ कारभाराविरोधात कराड आगार प्रमुखांना घेराव
कराड – कराड आगाराच्या ढिसाळ कारभाराविरोधात सोमवारी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रभारी आगारप्रमुख जे. डी. पाटील यांना घेराव घातला. अधिकाऱ्याच्या मुजोरीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून त्यांची बदली करावी, आगाराचा कारभार सुधारावा, अन्यथा एसटी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून बांधण्यात आलेल्या कराडच्या नवीन बसस्थानकात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. बसस्थानकाच्या आवारात मद्यपी व टवाळखोरांचा वावर वाढल्याने महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडत आहेत. उत्पन्न घटल्याचे कारण सांगत कराड आगाराने अनेक बस फेऱ्या रद्द केल्या आहेत. रविवारी काले, दुशेरे, केसे, तांबवेसह अनेक मोठ्या गावांतील बसफेऱ्या बंद ठेवल्या जातात. यामुळे क्‍लासला येणाऱ्या विद्यार्थी, निमशासकीय कर्मचारी व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. उंडाळे येथील पास वितरण सेवा बंद करण्यात आली आहे. यासह अन्य कारणांवरून आक्रमक झालेल्या पदाधिकाऱ्यांनी प्रभारी आगारप्रमुख पाटील यांना घेराव घातला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, अनिल घराळ, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, युवक कॉंग्रेसचे सातारा जिल्ह्याचे महासचिव इंद्रजीत भोपते, साबिरमियॉं मुल्ला, अदिल मोमीन, झाकीर पठाण, मराठा महासंघाचे गणेश पवार, महेश भोसले, वैशाली जाधव, संदीप साळुंखे, योगेश झांबरे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, प्रभारी आगार व्यवस्थापकाकडून प्रवाशांना मुजोर वागणूक देण्यात येत आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्याची तातडीने बदली करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)