बसस्थानकाच्या मुजोर अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी

पाच संघटना आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

कराड – कराड बसस्थानक नेहमीच या ना त्या कारणानी सतत चर्चेत असते. गेली अनेक वर्षे रखडलेले बसस्थानकाचे काम पूर्ण होऊन जानेवारी महिन्यात त्याचे उद्‌घाटन मोठ्या थाटामाटात झाले. मात्र बसस्थानक आगारप्रमुखांच्या दुर्लक्षामुळे या नूतन वास्तूला थोड्याच दिवसात बकाल स्वरुप आले आहे. सद्यस्थितीत कराड बसस्थानक म्हणजे तळीरामांचा अड्डा बनला आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या पाच संघटनांच्या पदाधिकारी व माध्यम प्रतिनिधींना उलट-सुलट उत्तरे करत कार्यालयातून बाहेर काढल्याची घटना बुधवारी घडली. याबाबत संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.

अशा मुजोर अधिकाऱ्याची तात्काळ बदली करुन कराड आगाराला जबाबदार व सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांना सोमवारी देण्यात येणार आहे. तसेच बदली न झाल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल घराळ, मराठा क्रांती मोर्चाच्या वैशाली जाधव, अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश पवार, मराठा महासंघाचे सदस्य महादेव थोरात व संदीप पवार, राजे प्रतिष्ठानचे अक्षय निकम यांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या काही दिवसांपासून कराड बसस्थानकाच्या आवारात तळीरामांचा वावर वाढला आहे. बसस्थानक आवारात दारुच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसतो. बसस्थानक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून दररोज हजारो लोक प्रवास करत असतात. विशेषत: महिला, महाविद्यालयीन युवतींचा मोठा समावेश आहे. कराड नगरपालिकेच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी मोठ्या शर्थीने प्रयत्न करुन स्वच्छ सर्वेक्षणात देशात कराडचे नाव उज्ज्वल केले आहे. मात्र कराड बसस्थानकाच्या बकाल स्वरुपामुळे शहराच्या यशाला काळिमा फासला जात आहे. आगारातील शौलायांमध्ये अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरली आहे. तसेच अनाधिकृत फेरीवाले, चहावाले यांचा वावर वाढला आहे. असे असताना एसटी प्रशासनाने याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.

याबाबत कराड आगारप्रमुख जे. के. पाटील यांच्याकडे विचारणा करण्यासाठी गेलेल्या पाच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना व माध्यम प्रतिनिधींना त्यांनी उलट उत्तरे करत कार्यालयातून बाहेर काढले. पाटील यांच्याबाबत आगारातील इतर अधिकारी, प्रवाशी यांच्याबाबत सतत तक्रारींचा पाढा सुरु असतो. तरी देखील आपल्या वर्तणुकीत ते बदल करत नाहीत. उलट त्यांची मुजोरी वाढतच चालली आहे. अशा मुजोर अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे. त्यांची तात्काळ बदली व्हावी, या मागणीसाठी तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे गणेश पवार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल घराळ यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

माध्यम प्रतिनिधींना हीन वागणूक

कराड बसस्थानकाच्या आगारप्रमुखांकडून माध्यम प्रतिनिधींना नेहमीच हीन वागणूक दिली जाते. कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. बुधवारीही विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत गेलेल्या काही दैनिकाच्या माध्यम प्रतिनिधींबरोबर बेजबाबदार वर्तन केल्यामुळे विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी या मुजोर अधिकाऱ्याविरुध्द आक्रमक पवित्रा घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)