शास्ती वगळून मूळ मिळकत कर भरून घेण्याची मागणी 

पिंपरी – तीन पट शास्तीने शहरातील नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. मूळ शास्ती कर भरण्यास नागरिक तयार असून, त्यापासून मिळणारा कोट्यवधी रुपयांचा महसूल महापालिकेने जमा करुन घ्यावा, अशी मागणी शास्तीकरबाधित नागरिकांनी केली आहे. महापालिकेतील विरोधी पक्ष नेते कार्यालयात दत्ता साने यांच्यासह लघु उद्योग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.15) पिंपरी-चिंचवडकरांची कैफियत मांडली. त्यावेळी शास्तीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी दत्ता साने यांनी आपली भूमिका मांडली. सत्तेमध्ये येण्यासाठी शास्ती माफ करण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते. मात्र, निवडणूक झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडकरांना त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे. 100 दिवसांत शास्ती माफ करण्याचे आश्‍वासन देणारे राजकीय पुढारी कुठे आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

600 मीटर यार्डातील मिळकतधारकांना नागरी सुविधा पुरविली जात असताना रेडझोनची मर्यादा दोन हजार यार्डावर वाढविल्याने, महापालिका प्रशासनाने या सर्व मिळकतधारकांवर शास्ती लादली आहे. याच न्यायानुसार प्राधिकरणाचे जुने प्रशासकीय कार्यालय व अनेक पेठांचादेखील समावेश होतो. त्यांना मात्र, वेगळा न्याय महापालिका प्रशासनाकडून लावला जात आहे. त्यांच्यावर महापालिका का मेहेरबानी दाखवत आहे? असा सवाल पिंपरी-चिंचवड लघुु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी उपस्थित केला.

याशिवाय मूळ मिळकत कर भरुन घेतला जात नसल्याने ऑनलाईन पद्धतीने भरुन घेतलेली रक्कम शास्तीमधून वजा केली जात आहे. मूल मिळकत कर तसाच शिल्लक दाखविला जात आहे. ही करदात्या नागरिकांची घोर फसवणूक आहे. याशिवाय महापालिका प्रशासनाने घरगुती, व्यापारी, व्यावसायिक असा कोणताही भेदभाव न करता मूळ मिळकत कर भरुन घ्यावा, अशी यावेळी मागणी करण्यात आली. येत्या गुरुवारी (दि. 18) सकाळी साडे अकरा वाजता आकुर्डी चौकातील खंडोबा मंदिर प्रांगणात बैठक आयोजित केली आहे. त्या बैठकीला शास्तीकरबाधित नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी जयंत कड, राजेंद्र चेडे, सचिन पाटील, किशोर राजशिर्के, अब्बास तांबोळी आदी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)