पुण्याच्या पुरातत्त्वीय सर्वेक्षणाची मागणी अव्यवहार्य

इतिहासतज्ज्ञांचे मत : मेट्रो प्रकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर मागणी

पुणे,दि. 28 – शहरातील मेट्रो प्रकल्पाचे बांधकाम हे सातत्याने नवनवीन वादात सापडत आहे. स्वारगेट येथे भुयार सापडल्यानंतर मेट्रोसंदर्भातील नवीन मुद्दा नव्याने उपस्थित केला जात आहे. स्वारगेटप्रमाणे कसबा पेठ, शनिवारवाडा या भागांमध्येदेखील जुने बांधकाम सापडण्याची शक्‍यता असल्याने मेट्रोचे काम सुरू करण्यापूर्वी या भागांचे पुरातत्त्वीय सर्वेक्षण केले जावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र अशा प्रकारचे सर्वेक्षण करणे शक्‍य नसून, पुरातत्त्वीय अवशेष सापडतील, की नाही याबाबत आताच काही बोलणे घाईचे ठरेल, असे मत इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केले.

शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी शहरात मेट्रो प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, सुरूवातीपासूनच हा मेट्रो प्रकल्प विविध वादांच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. कधी परवानग्यांचा, तर कधी वृक्षतोडीचा वाद. नुकतेच स्वारगेट येथे सापडलेले भुयार आणि ते बुजविण्यासाठी मिळालेली परवानगी असे विविध वाद मेट्रोसंदर्भात उद्‌भवले आहेत. मात्र, स्वारगेट येथील भुयारी मार्गांच्या अनुषंगाने अलीकडे एका नवीन वादाला तोंड फुटले आहे.

ज्याप्रमाणे स्वारगेट येथे ऐतिहासिक भुयार सापडले आहे, त्याप्रमाणे कसबा पेठ, शनिवारवाडा या भागातून मेट्रो जाणार असल्याने त्याही ठिकाणी पुरातन अवशेष सापडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच मेट्रोचे काम सुरू होण्यापूर्वी या भागांचे पुरातत्वीय सर्वेक्षण केले जावे, अशी मागणी शहरातील काही नागरिकांकडून केली जात आहे. हा परिसर म्हणजे पुण्याच्या जुन्या लोकवस्तीचा भाग असून अनेक ऐतिहासिक वास्तू या परिसरात होत्या. मात्र काळाच्या ओघात त्या गाडल्या जाण्याची शक्‍यता आहे. मेट्रोचे काम करताना या वास्तू सापडण्याची शक्‍यता असल्याने पुरातत्त्वीय सर्वेक्षण आवश्‍यक आहे, असे या नागरिकांनी सांगितले आहे.

मात्र, अशी मागणी म्हणजे भविष्यवाणी करण्यासारखी बाब आहे. अशाप्रकारचे पुरातन अवशेष सापडतील की नाही हे सांगणे या क्षणाला घाईचे ठरेल. त्यामुळे या मागणीत फारसे तथ्य नसल्याचे इतिहास अभ्यासकांकडून सांगण्यात आले आहे. एकूणच ही मागणी असंबद्ध असून, अशाप्रकारचे सर्वेक्षण सध्या तरी योग्य ठरणार नाही, असे मत इतिहास अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

कसबा पेठ भागात जुने पुणे वसलेले होते, ही बाब योग्य असली तरी याठिकाणी अवशेष मिळतीलच असे म्हणणे पूर्णत: चुकीचे ठरेल. ज्याप्रमाणे अवशेष मिळतील अशी शक्‍यता वर्तविली जात आहे, त्याप्रमाणे ते मिळणार नाही हे देखील शक्‍य असू शकते. त्यामुळे याबाबतीत सध्या भाष्य करण्यापेक्षा या प्रकल्पाच्या वाटचालीनुसार पुढील निर्णय घेणे योग्य ठरेल.
– मंदार लवाटे, इतिहास अभ्यासक.


पेशवेकालीन जलवाहिनीचे सर्व नकाशे इतिहास अभ्यासकांकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे स्वारगेट येथील भुयार हे त्या जलवाहिनीचा भाग नव्हता. ते भुयार ब्रिटिशकालीन आहे. त्यामुळे ती पुरातन वास्तू नाही. राहिला प्रश्‍न कसबा पेठ आणि शनिवाड्याच्या परिसराचा तर मेट्रो प्रकल्प मुळात जमिनीच्या 30 ते 35 फूट खाली असणार आहे. इतक्‍या खाली एखाद्या वास्तूचे अवशेष सापडणे अतिशय अवघड आहे. तसेच शहरातील जुन्या वाड्यांचा पाया हा जमिनीच्या तीन ते पाच फूट खोलीपर्यंतच असतो. त्यामुळे जुन्या वाड्यांनादेखील या प्रकल्पामुळे कोणताही धोका उद्‌भवणार नाही.
– पांडूरंग बलकवडे, इतिहास अभ्यासक.

स्वारगेट भुयाराचे महामेट्रो करणार संवर्धन
स्वारगेट येथे ट्रान्सपोर्ट हब उभारण्याचे काम सुरू आहे. तेथे जुने भुयार सापडले आहे. ते प्राचीन असून, पेशवेकाळात पाणी वाहून आणण्यासाठी बांधण्यात आले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, पुरातत्त्व विभागाच्या पाहणीत हे भुयार 1915 साली बांधण्यात आले असून, 1969 सालापर्यंत कार्यान्वित होते, असे नमूद करण्यात आले आहे. एकूणच हे भुयार “प्राचीन’ नव्हते. तसेच पेशवेकालीन पाणीवाहिनीचा भागही नव्हते. त्यामुळेच या भुयाराचे 10 मीटरपर्यंतचे अवशेष काढण्यासाठी पुरातत्त्व विभागाने परवानगी दिली आहे. तसेच या भुयारासाठी वापरण्यात आलेल्या दगडांवर क्रमांक टाकून ते भुयाराच्या प्रतिकृतीत वापरण्याच्या सूचनादेखील महामेट्रोला देण्यात आल्या आहेत. यानुसार महामेट्रोतर्फे ट्रान्सपोर्ट हब येथे भुयाराची प्रतिकृती उभारली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)