दिल्ली वार्ता: राहुल गांधी यांची नाराजी आणि झारीतील शुक्राचार्य

वंदना बर्वे

एकेकाळी देशभरात कॉंग्रेसचा असलेला बोलबाला आता ओसरलेला दिसून येत आहे. कॉंग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार असलातरी तो गांधी घराण्याच्या विश्‍वासातीलच असेल अशी शंका घ्यायला जागा आहे. पुढे काही महिन्यांत तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने कॉंग्रेस पुन्हा उभारी घेईल की नाही हे ठरेलच.

कॉंग्रेसच्या अंतर्गत राजकारणात नेमकं काय सुरू आहे? याचा थांगपत्ता लागत नाही. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन बरेच दिवस झाले आहेत. कॉंग्रेसच्या कार्यसमितीने नवीन अध्यक्षाची निवड करावी असे त्यांनीच सांगितले. मात्र, कार्यसमितीच्या सदस्यांमध्ये कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. राजीनामा स्वीकार करायचा की अमान्य करायचा? याचा निर्णय घेण्यासाठी कार्यसमितीने बैठकसुद्धा बोलावलेली नाही. म्हणून, कॉंग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे? असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे.

कॉंग्रेसचं पानिपत झालं तर या पराभवाचे विष कॉंग्रेसचे निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपसात वाटून घेत असत. थोडक्‍यात, काहीही झालं तर कॉंग्रेसच्या नेतृत्वाला धक्‍का लागू द्यायचा नाही, अशी संस्कृती कॉंग्रेसमध्ये जोपासली जात होती. कॉंग्रेस हायकमांडवरची निष्ठा सिद्ध करण्याची संधी शोधली जायची. यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असायची. 2004 मध्ये तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसला यश मिळालं होतं. संपुआ सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू होत्या. याच वेळेस सोनिया गांधी यांनी पंतप्रधान पद स्वीकारण्यास नकार दिला. त्यांचा हा निर्णय ऐकून निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना धक्‍का बसला होता. बिहारच्या सासाराम मतदारसंघाच्या खासदार मीरा कुमार (पुढे चालून त्या लोकसभेच्या अध्यक्षा झाल्या होत्या) या लोकसभेत ढसाढसा रडत होत्या. लोकसभा टीव्हीने याचं लाईव्ह प्रसारण केल्यामुळे लोकांना घरी बसून ते बघता आलं.

सांगायचं एवढंच की, कॉंग्रेसमध्ये निष्ठा सिद्ध करण्याची परंपरा होती. याची असंख्य उदाहरणे उपलब्ध आहेत. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारलं तेव्हा माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांनी यास “सुप्रीम सॅक्रेफाईस’ सांगून सोनिया गांधी यांची तुलना रामकृष्ण परमहंस आणि महात्मा गांधी यांच्याशी केली होती.

मात्र, आता परिस्थिती खूप बदलली असल्याचे जाणवू लागले आहे. राहुल गांधी यांना राजीनामा देऊन बरेच दिवस झालेत. मात्र, कुणीही राजीनामा दिला नाही. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत, ज्योतिरादित्य सिंधिया, दीपक बाबरिया, पी. एल. पुनिया आणि मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला. यांना सोडलं तर अन्य कुणीही राजीनामा दिलेला नाही. मात्र, महासचिव के. सी. वेणुगोपाल, अविनाश पांडे, जितेंद्र सिंग, राजीव सातव, आर. पी. एन. सिंग, शक्‍तीसिंग गोहिल, सचिन पायलट यांनी पराभवात सर्वांचा वाटा असल्याचं सांगून टाकले मात्र, राजीनामा का दिला नाही? हा खरा प्रश्‍न आहे. कारण, ही सगळी मंडळी राहुलची टीम म्हणून ओळखली जाते. या कारणामुळे पक्षातील पदाधिकाऱ्यांना राहुल गांधी यांचं नेतृत्व मान्य नाही का? अशी कुजबूज मुख्यालयात सुरू आहे.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, राहुल गांधी यांनी खरंच पराभवाच्या कारणामुळे राजीनामा दिला आहे काय? की राजीनामा देण्यामागचं दुसरं वेगळं कारण आहे. हा संशोधनाचा विषय आहे. मुळात, राहुल गांधी यांनी निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे राजीनामा दिलेला नाही, असा गौप्यस्फोट कॉंग्रेसमधील नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केला. त्यांच्यानुसार, कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही. उलट दिशाभूल करण्याचं काम केले. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सांगताना ते म्हणाले की, माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत कॉंग्रेसची आघाडी व्हावी असे राहुल गांधी यांना वाटत होते.

मात्र, आघाडी होऊ शकली नाही. तिकीट वाटपातही दिशाभूल करण्यात आली, असे सूत्राचे म्हणणे आहे. लोकसभेच्या निकालानंतर झालेल्या कॉंग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी-वढेरा यांनी पदाधिकाऱ्यांचा समाचार घेतला होता. आता पुढच्या बैठकीत काहीतरी निर्णायक होण्याची भीती सर्वांच्या मनात आहे. यात किंचितही दुमत नाही की, कॉंग्रेसचा पुढचा अध्यक्ष गांधी कुटुंबाव्यतिरिक्‍त कुणी झाला तर तो गांधी कुटुंबाचा विश्‍वासू असेल. शिवाय, राहुल गांधी सध्याच्या ज्या पदाधिकाऱ्यांवर नाराज आहे त्यांच्यापैकी कुणाचीही वर्णी या पदावर लागणार नाही. सांगायचं एवढंच की, पदाधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

येत्या काही महिन्यांत महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये विधानसभेची निवडणूक होणे आहे. परंतु, कॉंग्रेस तुल्यबळ लढत देण्याच्या स्थितीत नाही. अध्यक्षपदाचं घोंगडं सुद्धा भिजत आहे. अशातच, सोनिया गांधी यांचे निकटचे जनार्दन द्विवेदी यांनी वक्‍तव्य देऊन साचलेल्या संथ पाण्यात खडा मारला आहे.

प्रियांका गांधी यांनी राहुल गांधींच्या राजीनाम्याला विरोध दर्शविला होता. त्यांनी राजीनामा दिला, तर कॉंग्रेस कार्यकारिणी समितीच्या सदस्या म्हणून राहणं त्यांच्यासाठी अवघड होऊन बसेल. कॉंग्रेसमधील आणखी एक युवा नेता सचिन पायलट यांनी राजस्थानात पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी पाच वर्षे प्रचंड मेहनत केली होती. राजस्थानात कॉंग्रेस सत्तेत आल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री बनायचं आहे, याचेही त्यांनी स्पष्ट संकेत दिले होते. पण पद आपल्याकडून हिसकावून अशोक गहलोत यांना देण्यात आल्याचं सचिन पायलट यांचं म्हणणं आहे.

अशोक गहलोत हे कॉंग्रेसच्या या सापशिडीच्या राजकारणातले जुने-जाणते खेळाडू आहेत. राजस्थानचं मुख्यमंत्रिपद सोडायला ते तयार नाहीत. अशोक गहलोत यांनी जाहीरपणे म्हटलंय की, राहुल गांधी यांच्या राजीनाम्याने कॉंग्रेसमधील सर्व नेत्यांना प्रेरणा मिळाली. मुंबईत राजीनाम्याबाबत बोलताना राहुल गांधी यांनी आणखी 10 पट जोमानं लढणार असल्याचा आत्मविश्‍वास स्पष्ट केला. मी शेतकरी, कामगार आणि गरिबांच्या बरोबर आहे, ही विचारांची लढाई आहे, ती पुढेही सुरू राहील, जशी गेल्या 5 वर्षांत सुरू होती तशीच ती पुढेही सुरू राहील, असे म्हटले होते.

कॉंग्रेसच्या पक्षघटनेनुसार अशा परिस्थितीमध्ये कॉंग्रेसचे सर्वांत ज्येष्ठ सरचिटणीस हंगामी अध्यक्ष म्हणून काम सांभाळतात. सध्या मोतीलाल व्होरा कॉंग्रेसचे सर्वांत ज्येष्ठ सरचिटणीस आहेत. अशी शक्‍यता आहे, ते लवकरच पक्षाच्या कार्यकारी समितीची बैठक बोलवतील आणि त्यामध्ये पक्षाचं पुढचं पाऊल ठरवण्यात येईल. तोपर्यंत शंका-कुशंका आणि अस्थिरतेचं वातावरण असंच कायम राहील!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)