दिल्ली वार्ता: भारताविरुद्धच भारतीय तरुणांचा गैरवापर?

वंदना बर्वे

मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारा अजमल कसाब पाकिस्तानातून आला होता. मात्र, पुलवामा जिल्ह्यात राखीव दलाच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला करणारा आदिल डार हा पाकिस्तानचा नव्हे; तर काश्‍मीरचा तरुण होता. आता, भारतातील तरूण भारतीयांवरच हल्ला करण्यास तयार असेल तर पाकिस्तानला भारतात दहशतवादी पाठविण्याची गरजच काय? केंद्र सरकार आणि काश्‍मीरवासीयांमध्ये संवादाअभावी निर्माण झालेला दुरावा दहशतवाद्यांना पोषक तर ठरत नाही ना? याचा बारकाईने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघाती हल्ल्‌यात हल्ला करणारा तरुण काश्‍मिरी असला तरी यामागे जैश-ए-महंमद या पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनेचा हात आहे. यामुळे 44 जवानांच्या हौतात्म्याचा हिशेब बरोबर केला जात नाही तोपर्यंत भारत सरकार स्वस्थ बसणार नाही, अशी अपेक्षा 125 कोटी भारतीयांनी आपल्या उरात बाळगली आहे. पाकिस्तान आणि पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनांना कायमची अद्यल घडेल असे काही तरी करायला हवे; या पुण्यकार्यात भारताचे जवान कोणतीही उणीव ठेवणार नाही, याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही.

मात्र, लष्करी कारवायांसोबतच बरेच काही वेगळे करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण, तीनशे किलोचं स्फोटक साहित्य गाडीत भरून केंद्रीय राखीव दलाच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला करणारा आदिल डार हा 22 वर्षांचा काश्‍मिरी तरुण होय. भारतातील तरुण भारतातच असंतोष निर्माण करण्यासाठी काहीही करण्यास तयार असेल तर पाकिस्तानला भारतात दहशतवादी पाठविण्याची गरजच काय? अक्षयकुमारच्या बेबी’ चित्रपटात अभिनेता डॅनीने नेपाळमध्ये कोडवर्ड ऑपरेशन करण्यापूर्वी परराष्ट्र मंत्र्याशी साधलेला संवाद पुलवामा हल्ल्‌याशी तंतोतंत जुळणारा आहे. डॅनी म्हणतो, “आपल्या देशातील तरूण पाकिस्तानात जावून भारतावर हल्ला करण्यासाठी मदत करीत असेल तर हे पाकिस्तानचे यश नव्हे तर आपले फेल्युअर आहे.’

पुलवामामध्ये हाच प्रकार घडला आहे. कदाचित म्हणूनच, पुलवामातील हल्ला भारतासाठी सतर्कतेचा इशारा आहे, असे सुरक्षा आणि काश्‍मीर विषयाचे जाणकार मानतात. कारण, अशाप्रकारचा हल्ला यापूर्वी कधीच झाला नव्हता. काश्‍मिरचा रहिवासी आदिल 2018 पासून बेपत्ता होता. आई-वडिलांनी त्याला शोधण्याचा बराच प्रयत्न केला होता. शेवटी त्यांनी त्याचा शोध थांबविला. हाच आदिल अचानक काश्‍मिरात परतला. तीनशे किलोची स्फोटके गाडीत भरून जवानांच्या गाडीला जावून भिडला.

मुद्दा येथे संपत नाही. आदिलच्या डोक्‍यातील फितुरी अन्य तरुणांच्या डोक्‍यात शिरली असेल तर त्याचे किती भयंकर परिणाम होवू शकतात, याची कल्पना न केलेलीच बरी. म्हणून, पाकिस्तानला भारतीय तरुणांचा गैरवापर भारताविरुद्ध करण्याची संधी मिळणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांना वाटते. पुलवामातील हल्ल्‌यानंतर आपल्या जवानांच्या हौतात्म्याचा सूड घेण्यासाठी सुरक्षा सल्लागार, संरक्षण सचिव आणि जवानांनी काय-काय करायला पाहिजे, हे त्यांना सांगण्याची काहीच गरज नाही. जवानांनी आता सर्जिकल स्ट्राईक करायला पाहिजे. किती वेळेत करायला पाहिजे? कसे करायला पाहिजे? सिंधू नदीचे पाणी अडविले पाहिजे? अशाप्रकारच्या सुचना वृत्तवाहिन्यांच्या अँकरनी स्वत:जवळ ठेवाव्यात.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी “काश्‍मीरमधील दहशतवादी लवकरच कायमचे दिसेनासे होतील’, असा दावा वारंवार केला. परंतु सत्य अगदी उलट असल्याची जाणीव या हल्ल्‌याने करून दिली. काश्‍मीरमधील स्थिती आणखी खराब होताना दिसत आहेत. लष्कराचा काश्‍मीरमध्ये झालेला वापर आणि तशा पद्धतीची रणनीती ही स्थिती सांभाळण्यात अपयशी ठरल्याचं दिसतं.

मागील काही वर्षांत कट्टरवाद्यांचे आत्मघाती हल्ले जवळपास बंद झाले होते. परंतु, अचानक पुलवामाचा हल्ला झाला. काही वर्षांपूर्वी आत्मघातकी हल्ले होणं, लष्कराला निशाणा बनवणं नियमित प्रक्रिया झाली होती. आता आपण पुन्हा त्याच दिशेने जात आहोत की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाकिस्तान आणि पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनांना भारतीय तरुणांचा वापर भारताच्या विरोधात करता येणार नाही, याची खास काळजी सरकारने घेणे गरजेचे आहे. विशेषतः वहाबी मुस्लिम तरुण या लढाईत उतरल्यापासून काश्‍मीरात एक नवा खेळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे. पुलवामाचा हल्ला हा गेल्या काही वर्षातला सर्वात मोठा हल्ला आहे. काश्‍मीरचा लढा एक मोठा लढा आहे. वर्ष 1990 पासून येथे दहशतवाद फोफावला आहे. हा प्रश्‍न एका दिवसात किंवा निव्वळ गोळीबारानेही संपणारा नाही.

सरकारी अहवालानुसार, हा हल्ला एका स्थानिक तरुणानं घडवून आणला आहे. स्थानिक तरुण आयसिस व वहाबी विचारधारेच्या जवळ जाताना दिसत आहेत. हीच स्थिती सर्वात चिंताजनक आहे. भारत सरकारला याकडं गांभीर्यानं पाहावं लागेल. यावर वेगळा उपाय शोधावा लागेल.

यासाठी संवादाचा मार्ग उघडा करावा लागेल. भारत सरकारला काश्‍मीरमधील तरुणांशी, लोकांशी संवाद साधावा लागेल. जे लोक नाराज आहेत त्यांच्याशीही बोलावं लागेल. खरं तर आपण त्या लोकांचा विचार करायला पाहिजे, जे अशा कट्टरतावाद्यांपासून दूर आहेत. त्यामुळे या प्रकरणात कुठलंही राजकारण करणं चुकीचं आहे. आपल्याला स्थानिक लोकांशी संवाद करावाच लागेल.

कश्‍मीरचा तरुण जैश-ए=मोहम्मद, लष्कर-ए-तोयबासारख्या अतिरेकी संघटनांच्या आमिषाला बळी पडत आहे काय? असेल तर किती तरूण सध्या यात गुंतले आहेत? किती तरूण घरातून बेपत्ता आहेत? किती दिवसापासून आहेत? या सर्व गोष्टींवर बारीक नजर ठेवणे गरजेचे आहे. सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर असा हल्ला होणे चिंतेची बाब आहे.
गेल्यावर्षी 250 हून अधिक कट्टरतावाद्यांना लष्करानं संपवल्याचा दावा सरकारनं केला होता; ज्यात अशा संघटनांच्या म्होरक्‍यांचाही समावेश होता. आता दक्षिण काश्‍मीर कट्टरतावाद्यांचा अड्डा होताना दिसतंय. वर्ष 2016 मध्ये हिजबुलचा कमांडर बुऱ्हान वाणीला लष्करानं संपवलं. त्यानंतरच्या तीन वर्षात दक्षिण काश्‍मीरमधील अनेक स्थानिक तरुण कट्टरवादी संघटनांमध्ये सामील झाले असावेत, अशी शंका आहे.

महत्त्वाचा प्रश्‍न असा की, तीनशे किलो स्फोटकांनी भरलेली गाडी फिरत राहिली आणि त्याची साधी चाहुलसुध्दा कुणाला लागू नये, ही बाब खूप गंभीर आहे. जम्मूपासून श्रीनगरला जाणाऱ्या सीआरपीएफ दलामध्ये 2400 जवान होते. म्हणजेच सीआरपीएफच्या हालचालींसाठीचे नियम तोडले गेले आहेत. एकाचवेळी इतक्‍या लोकांना एकत्र जाता येत नाही. आयईडी स्फोटाचा जेथे धोका असतो, तेथे गाड्या वेगाने जातात. मात्र हा ताफा संथगतीने का जात होता?

इतक्‍या मोठ्या प्रमाणात दारुगोळा खोऱ्यात कसा आला? हा दारुगोळा सुरक्षितपणे कुणी आणि कुठे ठेवला? हाच दारुगोळा नीटपणे गाडीत भरला गेला. त्या गाडीवर डिटोनटर्सही लावले गेले. ती गाडी सुरक्षा दलांच्या गाडीजवळ कशी पोहोचली? कोणालाच त्याचा काहीही पत्ता कसा काय लागला नाही? हल्ल्‌यासाठी गाडी आणि हल्लेखोराला तयार करण्यासाठी अनेक दिवस लागले असतील, त्याबाबत आपण अंधारातच कसे काय होतो? ही जबाबदारी स्थानिक गुप्तचर माहिती अधिकाऱ्यांची होती. ते ही माहिती गोळा करू शकले नाहीत. या भागातून जेव्हा सैनिकांचा ताफा जायचा तेव्हा नागरिकांच्या गाड्यांना जाण्याची परवानगी नसायची. ही यंत्रणा काही महिन्यांपूर्वीपर्यंत कार्यरत होती. राजकीय दबावानंतर नागरिकांना आपल्या गाड्या जवळून नेण्याची परवानगी मिळाली.

याचाच फायदा दहशतवाद्यांनी उचलला. दारुगोळ्याने भरलेली ही गाडी सुरुवातीला राजमार्गाच्या जवळील रस्त्यावरून ताफ्याबरोबर चालत राहिली आणि त्यानंतर एका रस्त्यावरून राजमार्गावर येऊन जवानांच्या वाहनांवर आदळली. सेनेच्या गाड्या निघून जात नाहीत, तोपर्यंत नागरिकांच्या गाड्यांना थांबवून ठेवण्यात आल्या असत्या, तर हा हल्ला टाळता आला असता.

थोडक्‍यात, प्रश्न अनेक आहेत आणि उपाय मोजकेच. काश्‍मीरचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सेनेच्या खांद्यावर टाकून सरकार हातावर हात ठेवून बसू शकत नाही. सरकारला उपाययोजना कराव्याच लागतील. काश्‍मीरी तरूण दहशतवाद्यांच्या गळाला लागणार नाही याची काळजी भारतालाच घ्यावी लागेल. सरकारने पाकिस्तानशी चर्चा करणे थांबविले ते एकप्रकारे चांगलेच झाले आहे. मात्र, काश्‍मीरवासीयांशी चर्चा थांबविण्याचे कारण नाही. कारण, काश्‍मीर भारताचा अविभाज्य अंग आहे तसेच काश्‍मीरवासी या देशाचे नागरिक आहेत. त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या समजून त्या दूर करण्याचे उपाय भारत सरकारलाच करावे लागतील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)