दिल्ली – दिल्ली पोलिसांनी आज रॉस अव्हेन्यू न्यायालयामध्ये अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी समर विशाल यांच्यापुढे राहुल गांधी यांच्यावरील राजद्रोहाच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या तक्रारीबाबत आपला कारवाई अहवाल सादर केला आहे. दिल्ली पोलिसांनी सादर केलेल्या कारवाई अहवालामध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात विधिज्ञ जोगिंदर तुली यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये राहुल गांधी यांच्यावर दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात येईल असे कोणतेही आरोप लावण्यात आले नाहीत अशी माहिती देण्यात आली आहे.
तत्पूर्वी, रॉस अव्हेन्यू न्यायालयाने दिल्ली पोलिसांना राहुल गांधी यांच्या, “पंतप्रधान मोदी हे भारतीय सैनिकांच्या रक्तामागे लपत असून ते सैनिकांच्या रक्ताची दलाली करत आहेत.” या वक्तव्याविरोधात विधिज्ञ जोगिंदर तुली यांनी दाखल केलेल्या राजद्रोहाच्या तक्रारीबाबत कारवाई अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
दिल्ली पोलिसांनी सादर केलेल्या कारवाई अहवालात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लावलेले आरोप हे बदनामी करणारे असून राहुल गांधींच्या या आरोपाविरोधात मोदी स्वतः बदनामीचा दावा दाखल करू शकतात असं देखील म्हणण्यात आलं आहे.
दरम्यान, आता या प्रकरणातील पुढील सुनावणी २२ मे रोजी होणार आहे.
Delhi Police today filed 'Action Taken Report' in Rouse Avenue Court, on criminal complaint seeking direction to police for registration of FIR u/s 124A (Sedition charges) against Rahul Gandhi for allegedly making derogatory statement against PM. (File pic) pic.twitter.com/ntuhiOphs0
— ANI (@ANI) May 15, 2019