दिल्लीचा बाद फेरीत प्रवेश; बंगळुरूचा 16 धावांनी पराभव

नवी दिल्ली – अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 16 धावांनी पराभव करत 16 गुणांसह क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 187 धावांची मजल मारत बंगळुरूसमोर विजयासाठी 188 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात खेळताना बंगळुरूला निर्धारित 20 षटकांत 7 बाद 171 धावांचीच मजल मारता आल्याने त्यांना 16 धावांनी पराभूत व्हावे लागले.

आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या बंगळुरूनेही धमाकेदार सुरुवात केली. सलामीवीर पार्थिव पटेल आणि विराट कोहलीयांनी पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजी करत 10 च्या सरासरीने धावा करायला सुरूवात केली. त्यामुळे बंगळुरूने 4.3 षटकांतच अर्धशतकी मजल ओलांडली. तर, पॉवर प्लेच्या सहा षटकांमध्ये 64 धावांची मजल मारली. मात्र पार्थिव पटेल 20 चेंडूत 39 धावा करुन बाद झाल्यानंतर विराट कोहलीही 23 धावा करुन परतल्याने चांगल्या सुरूवातीनंतरही बंगळुरूची 2 बाद 68 अशी अवस्था झाली. यानंतर आलेल्या शिवम डुबे आणि ए. बी. डिव्हीलियर्स यांनी संघाला शतकी मजल ओलांडून दिल्यानंतर डिव्हीलियर्स 17 धावा करुन परतला. यानंतर वेगाने फटकेबाजीकरणार डुबे आणि हेन्रिच क्‍लासिन देखील बाद झाल्याने बंगळुरूची 5 बाद 111 अशी घसरगुंडी उडाली.

यानंतर मार्कस स्टोइनिस आणि गुरकिरत सिंगयांनी संघाचा डाव सावरायला सुरूवात करत संघाला दिद शतकी मजल ओलांडून दिली. मात्र, बंगळुरूला विजयासाठी 12 चेंडूत 30 धावांची गरज असताना गुरकिरत सिंग 27 धावा करुन परतल्यानंतर बंगळुरूचा संघ विजयापासून दुर गेला. यावेळी स्टोइनिसने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे प्रयत्न अपुरे पडल्याने बंगळुरूला केवळ 171 धावांचीच मजल मारता आली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने आक्रमक सुरुवात केली. मात्र, पृथ्वी शॉ 18 धावा करून परतल्यानंतर आलेला कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांनी संघाचा दाव सावरताना फटकेबाजी करत धावगती देखील कायम राखली. त्यामुळे दिल्लीने पॉवर प्लेच्या सहा षटकांमध्ये 1 बाद 59 धावांची मजल मारली होती. पॉवर प्लेनंतरही दोघांनी आपली फटकेबाजी अशीच सुरू ठेवत 11.3 षटकांतच दिल्लीला अर्धशतकी मजल ओलांडून दिली. यावेळी सलामीवीर शिखर धवनने 36 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मोबदल्यात अर्धशतक पुर्ण केले.

मात्र, लागलीच तो परतल्याने दिल्लीला 103 धावांवर दुसरा धक्‍का बसला. धवन बाद झाल्यानंतर ऋषभ पंतला साथीत घेत श्रेयस अय्यरने फटकेबाजी सुरू ठेवली. मात्र, पंतला केवळ 7 धावाच करता आल्याने दिल्लीला तिसरा धक्‍का बसल तर त्या पाठोपाठ अर्धशतकवीर अय्यर देखील परतल्याने दिल्लीची अवस्था 12.2 षटकांत 1 बाद 103 वरून 16 षटकांत 4 बाद 131 झाली.

नंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांवर अंकुश लावत बंगळुरुने सामन्यात पुनरागमन केले. त्यामुळे दिल्लीची धावगती खालावली. यानंतर दिल्लीच्या मधल्याफळीतील रुदरफोर्ड आणि अक्षर पटेलयांनी 3.1 षटकांत 46 धावांची भागीदारी करत दिल्लीला 187 धावांची मजल मारुन दिली. यावेळी बंगळुरुकडून युझवेंद्र चहलने 2, तर उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनीने प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

संक्षिप्त धावफलक

दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 5 बाद 187 (श्रेयस अय्यर 52, शिखर धवन 50, शेरफान रुदरफोर्ड नाबाद 28, युझवेंद्र चहल 2-41, वॉशिंग्टन सुंदर 1-29) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – 20 षटकांत 7 बाद 171 (पार्थिव पटेल 39, मार्कस स्टोइनिस नाबाद 32, गुरकिरत सिंग 27, अमित मिश्रा 2-29, कगिसो रबाडा 2-31)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)