कामशेत पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा 

नाणे मावळ – शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, अनेक तांत्रिक अडचणी व ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे शहरातील पाणी पुरवठा योजना अक्षरश: बोजवारा उडाला आहे. ठराविक भागात नियमित पाणीपुरवठा होतो, उर्वरित वसाहतीत सुमारे चार ते पाच दिवस पाण्याची वाट पहावी लागत आहे. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

शहरातीलपाणी पुरवठा योजनेविषयी ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्‍त केली जात आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. कामशेत शहर हे नाणे, पवन व आंदर मावळातील तसेच पंचक्रोशीतील गावांसाठी प्रमुख मध्यवर्ती ठिकाण असल्याने तसेच शहरातून लोहमार्ग व महामार्ग गेले असल्याने नोकरदार वर्गासाठी हे शहर मध्यवर्ती आहे.

शहरात नवीन बांधकामेही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या सर्वाना पाणी पुरवठा कामशेत ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेतून होतो. काही वर्षात नवीन नळजोड ज्याप्रमाणात वाढले आहेत, त्याप्रमाणात पाणीपुरवठा योजनेत सुधार झाला नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. गेली अनेक वर्षांपासून अनेक भागात जुनी पाईप लाईन बदलली गेली नसल्याने ही पाईप लाईन गंजली खराब झाल्याने अनेक ठिकाणी कमी दाबाचा पाणीपुरवठा होत आहे. शहरातील ठराविक भागात नियमितपणे पाणी पुरवठा होत असून, अन्य प्रभागात चार-चार दिवस पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.

लोणावळा भागातून इंद्रायणी नदीच्या पात्रात मैलामिश्रित पाणी पावसाच्या पाण्यासह येत असल्याने सध्या अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत लोणावळा नगरपालिका यांना पत्राद्वारे लवकरच कळवणार असून, जलशुद्धीकरण प्रकल्प प्रभावीपणे राबवणार आहे. या प्रश्‍नी आम्ही कार्यरत असून, लवकरच या समस्येवर तोडगा काढण्यात येईल, कामशेत ग्रुप ग्रामपंचायतीचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)