शिंदे वासुली – महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या शिष्टमंडळाने सर्व पोलीस पाटलांच्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी व मागण्या मान्य करण्याची विनंती करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच मंत्रालयात भेट घेतली.
यावेळी राज्यमंत्री बाळा भेगडे, शिरुरचे आमदार बाबुराव पाचर्णे, पोलीस पाटील संघटनेचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे, पुणे जिल्हा माजी अध्यक्ष रोहिदास शिंदे, खेड तालुका कार्याध्यक्ष अमोल पाचपुते, मावळ तालुका उपाध्यक्ष राहुल आंबेकर, संतोष मांडेकर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, वय वर्षे 65 व नुतनीकरण, प्रत्येक जिल्ह्यात एक पोलीस पाटील भवन देणे, पोलीस पाटील कायद्यात दुरुस्ती अशा व इतर मागण्यांचा समावेश होता. याबाबत मुख्यमंत्र्यांनी काही मागण्या मान्य केल्या असून उर्वरित मागण्यांबाबत लवकरच बैठक लावून मान्यता दिली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली. प्रलंबित मागण्या प्रभावीपणे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी मांडल्या. आणि मुख्यमंत्र्यांनी वेळ देऊन काही प्रमाणात मान्य केल्याचे खेड तालुका कार्याध्यक्ष अमोल पाचपुते यांनी सांगितले