नवी दिल्ली- बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांना देण्यात आलेले सीआरपीएफचे संरक्षण आज काढून घेण्यात आले. काही अन्य व्यक्तींच्या सुरक्षेमध्येही कपात करण्यात आली आहे. केंद्रीय संरक्षित व्यक्तींना देण्यात आलेल्या संरक्षणाचा गृहमंत्रालयाकडून फेरआढावा घेण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. काही व्यक्तींना देण्यात आलेले केंद्रीय संरक्षण जरी काढून घेण्यात आले असले तरी राज्य पोलिसांकडून देण्यात येणारे संरक्षण यापुढेही कायम राहणार आहे.
केंद्रीय संरक्षित व्यक्तींच्या यादीमधून बसपाचे नेते सतिश चंद्र मिश्रा यांना काढण्यात आले आहे. त्यांना आता उत्तर प्रदेशात सीआरपीएफचे “झेड’ दर्जाचे संरक्षण दिले जाणार आहे. उत्तर प्रदेशातील भाजपचे मंत्री सुरेश राणा यांनाही केंद्रीय संरक्षित व्यक्तींच्या यादीतून वगळण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांना “वाय +’ संरक्षण देण्यात येत होते. पण आता त्यांचेही हे संरक्षण कमी करण्यात आले आहे.
झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांना केवळ झारखंडमध्येच “झेड’दर्जाचे संरक्षण दिले जाणार आहे. जनअधिकार पार्टीचे अध्यक्ष आणि माजी खासदार पप्पू यादव आणि भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनाही दिलेले “सीआरपीएफ’चे संरक्षण काढून घेण्यात आले आहे. त्यांना आता “वाय +’ ऐवजी “वाय’ दर्जाचे संरक्षण देण्यात येणर आहे.