मनी लॉंडरिंग प्रकरणी ईडीकडून पटेल यांची चौकशी
नवी दिल्ली- एअर इंडियाला झालेल्या आर्थिक नुकसानीमागील मनी लॉंडरींग प्रकरणी आज “ईडी’ने माजी विमान वाहतुक मंत्री प्रफुल्ल पटेल यांची चौकशी केली आहे. हे प्रकरण म्हणजे कोट्यवधी रुपयांचा विमान वाहतुकीतील घोटाळा असल्याचे “ईडी’ने म्हटले आहे.
प्रफुल्ल पटेल हे कॉर्पोरेट लॉबीस्ट दीपक तलवार यांचे प्रिय मित्र आहेत. आपली कामे करून घेण्यासाठी तलवार यांनी इतर काही मंत्र्यांशी आणि इतरांशीही निकटचे संबंध ठेवले आहेत, असे “ईडी’ने दिल्लीतल्या न्यायालयामध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. महिन्याभरापूर्वी “ईडी’ने या प्रकरणी केलेल्या तपासाचा अंतिम अहवाल सादर केला. कतार एअरवेज, अमिराती ऍन्ड एअर अरेबिया सारख्या विदेशी खासगी विमान कंपन्यांना फायद्याच्या हेतूने वाटाघाटी झाल्या आणि त्यामुळे एअर इंडियाला मोठे नुकसान झाल्याचाअ आरोपही “ईडी’ने केला आहे.
“ईडी’ने तलवार यांना अटक केले असून ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. तलवार यांनी अमिराती ऍन्ड एअर अरेबियाच्यावतीने पटेल यांच्याशी वाटाघाटी केल्या. यामध्ये तलवार यांनी आपले संबंध वापरून खासगी विमान कंपन्यांना झुकते माप मिळवले असे “ईडी’ने 1 मे रोजीच्या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.
“ईडी’ने वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या तपासामध्ये पटेल आणि तलवार यांच्यातील संभाषणाच्या “सॉफ्ट डाटा आणि जप्त केलेल्या कागदपत्रांमधून तलवार यांचे पटेल आणि अन्य अधिकारी, राजकीय व्यक्ती, मंत्र्यांचे निकटचे संबंध असल्याचे निष्पन्न होते.’ असे विशेष सरकारी वकिल नितेश राणा यांनी न्यायालयात सांगितले. विमान वाहतुक मंत्रालय, “नॅशनल एव्हिएशन कंपनी लिमिटेड’ आणि एअर इंडियातील विदेशी विमान कंपन्यांना झुकते माप देणाऱ्या अन्य अधिकाऱ्यांना शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे “ईडी’ने पूर्वीच सांगितले आहे.