नैसर्गिक वायू, रिऍल्टी, ऊर्जा, धातू कंपन्या पिछाडीवर
मुंबई – निर्देशांक उच्च पातळीवर असतानाच जेट एअरवेज कंपनी काही काळ बंद राहणार आहे. याचा नकारात्मक परिणाम शेअरबाजारात होऊन बरीच नफेखोरी झाल्यामुळे निर्देशांकांत घट झाली.
आज गुंतवणूकदारांनी नफ्याकरिता तेल आणि नैसर्गिक वायू, रिऍल्टी, ऊर्जा, धातू, दूरसंचार, भांडवली वस्तू आणि बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री केली. गुरुवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 135 अंकांनी म्हणजे 0.34 टक्क्यांनी कमी होऊन 39,140 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक 34 अंकांनी कमी होऊन 11,752 अंकांवर बंद झाला.
सरलेल्या आठवड्यात मात्र सेन्सेक्स 373 अंकांनी व निफ्टी 109 अंकांनी वाढला. या घटनाक्रमाचे विश्लेषण करताना एम्के मालमत्ता व्यवस्थापन संस्थेचे संशोधन प्रमुख जोसेफ थॉमस यांनी सांगितले की, निवडणुकांमुळे आगामी काळात गुंतवणूकदार सावध राहणार आहेत. त्याचबरोबर कंपन्यांच्या ताळेबंदातील आकड्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे.
मंगळवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 1038 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली त्याचबरोबर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 37 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. आगामी काळात बऱ्याच सुट्ट्या असल्यामुळे जागतिक शेअरबाजारांचे निर्देशांकही गुरुवारी बरेच अस्थिर होते. गुरुवारी क्रुडचे दर कमी होऊन 71.50 प्रति पिंप झाले तर रुपयाचे मूल्य पाच पैशांनी वधारून प्रतिडॉलर 69.55 रुपये झाले.