कांबळे दुसरी, तर लोखंडे सातवी नापास ; ठरवा दिल्लीसाठी कोण लायक उमेदवार : वाकचौरे

अकोले: आ.भाऊसाहेब कांबळे दुसरी नापास असून सहीचा निशाणी अंगठा आहे. तर दुसरे खा. सदाशिव लोखंडे सातवी नापास असून पाच वर्षात मतदारसंघात फिरकले नाही. असे उमेदवार पक्षांनी दिले आहे. ठरवा यापैकी दिल्ली कोण लायक आहे. त्या उलट प्रशासनाचा अनुभव व जनतेशी संपर्क असल्याने अपक्ष म्हणून खासदार म्हणून निवडून येऊ शकतो. म्हणून अपक्ष रिंगणात उतरणार असल्याचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी जाहीर केले.

अकोले येथील पंकज लॉन्समध्ये वाकचौरे समर्थकांची बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी अपक्ष म्हणून आपल्याला प्रतिसाद चांगला भेटत असून आपण निश्‍चित निवडून येणार असा त्यांनी विश्‍वास व्यक्त केला. जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी अपक्ष उमेदवारी करत आहे. माझा पक्ष जनता हाच आहे. मला पदाची लालसा नाही. पण मी केवळ नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे ताकद उभी करावी म्हणून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहे असा दावा त्यांनी केला.

विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे व आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर बोचरी टीका केली. तेरा दिवसांचे खासदार राहिलेले जनतेत गेले नाहीत आणि त्यामुळे न भेटणारा खासदार पुन्हा निवडून येणार नाही, असा ठाम दावा करून सही निशाणी अंगठा असणारे त्यांना साधी हिंदीही बोलता येत नाही. त्यांनी निवडणुकीला उभे राहून निवडून येण्याची स्वप्ने पहावी अशा प्रकारची खिल्ली त्यांनी उडवली.

आपण पक्ष पक्षांतर करणार नाही याबाबत साईंची शपथ घेतली होती. हे मान्य करून पण ती शपथ सोडून घेतल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले आणि पक्षांतरामुळे आपली बदनामी करणारे आता साईंच्या शापाला बळी पडतील अशी त्यांनी टीका केली. शिवाय प्रवाहाच्या विरूद्ध पोहणे आपला स्थायीभाव असून शिवसेना सोडली याला विखे पाटील जबाबदार नाही तर कॉंग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाने मला पक्षात प्रवेश दिला होता.

विखेंची नाहक बदनामी केली जात आहे, असे सांगून शिवसेना सोडली कारण अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आलेले अपयश, अकोले नगरपंचायतमध्ये आलेले अपयश आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी अनपेक्षित अपयश पदरी पडल्याने आपण नाराज झालो.

त्यावेळी पक्षाची साथ भेटली नाही आणि त्या कारणास्तव आपण शिवसेना सोडली होती अशी असा गौप्यस्फोट त्यांनी केला. साई संस्थानच्या कारभाराबाबत आपल्या विरुद्ध अपप्रचार केला जात आहे. तो निखालस खोटा असून यासंदर्भात सायबर शाखेकडे गुन्हा नोंदवला आहे आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई होईल, असा त्यांनी दावा केला. पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी अपक्ष म्हणून आपल्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले. विरोधी दोन्ही उमेदवार आपल्या या लढतीसाठी तुल्यबळ नाही असा त्यांनी कांगावा केला. या बैठकीला शिवसेना भाजप आणि कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील निवडक कार्यकर्तेही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)