ठरले ! रोहित पवार या मतदारसंघातून निवडणूक लढविणार

पहिली 80 उमेदवारांची यादी निश्‍चित : पालकमंत्र्यांपुढे आव्हान

नगर – राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू केली असून पहिली 80 उमेदवारांची यादी निश्‍चित केली आहे. या पहिल्या यादीत कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या उमेदवारीवर शिक्‍कामोर्तब झाले आहे. त्यामुळे पवार यांनी मतदारसंघात संपर्क मोहिम अधिक प्रभावी करण्यास सुरवात केली आहे. पवार यांच्या उमेदवारीमुळे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासमोर तगडे आव्हान आता उभे ठाकले आहे.

गेल्या वर्षभरापासून कर्जत-जामखेडमधून पवार यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू होती. लोकसभा निवडणुकीपासून तर पवार यांनी या मतदारसंघात जातीने लक्ष देण्यास सुरूवात केली. त्यामुळे तेच पक्षाचे उमेदवार असतील. हे स्पष्ट झाले होते. मध्यतंरी दुष्काळी दौऱ्यावर असतांना शरद पवार यांनी देखील जामखेडमध्ये रोहित पवार यांच्या उमेदवारीबाबत सुतोवाच केले होते. त्याबरोबर कर्जत व जामखेड तालुक्‍यातील नेते व कार्यकर्त्यांनी पवार यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला होता.अखेर पक्षाने पहिल्या 80 उमेदवारांची यादी निश्‍चित केली. त्यात पवार यांच्या उमेदवारीवर शिक्‍कामोर्तब झाले आहे. अर्थात पवार यांनी गेल्या काही महिन्यांपासून त्या दृष्टीने मतदारसंघात विविध उपक्रम राबवून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. त्यांनी राबविलेल्या या उपक्रमांना दोन्ही तालुक्‍यातून मोठा प्रतिसाद मिळाला. जी कामे सरकार व पालकमंत्री म्हणून प्रा. शिंदे यांनी करणे आवश्‍यक होती. परंतु ती करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. ती कामे रोहित पवार यांनी मार्गी लावली. त्यामुळे या मतदारसंघात पवार यांच्याबद्दल आपुलकी व प्रेम वाढू लागले आहे.

यंदाच्या दुष्काळाची या दोन्ही तालुक्‍यांना मोठी झळ बसली होती. शासन व प्रशासनाकडून उपाययोजना राबविण्यात येत होत्या.पण या उपाययोजना तोकड्या पडल्या. तेव्हा पवार यांनी तातडीने केलेल्या उपाययोजनांचा मोठा आधार या दोन्ही तालुक्‍यांना झाला. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तब्बल 80 टॅंकर बारामती ऍग्नोच्या माध्यमातून पवार यांनी सुरू केले. ज्या भागात दोन ते तीन टॅंकर आवश्‍यक होते. ते प्रशासनाकडून एक टॅंकर दिला जात होता. अशा ठिकाणी पवार यांनी त्या दोन टॅंकरची गरज भागविली. जामखेड व कर्जतकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करू त्यांची तहान भागविली.

जामखेडकरांची तहान भागविणारा भुतवडा तलाव कोरडा पडल्यानंतर त्याचा फायदा घेवून तलावातील गाळ काढण्याचे काम पवारांनी केले. त्यासाठी यंत्रणा उभारून जेसीबी, पॉकलेन देवून गाळ काढून तलावाची साठवण क्षमता वाढविली. अनेक गुणवत्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भार पवारांनी उचलला असून त्यांना दत्तक घेतले आहे. तसेच नुकत्याच झालेल्या पावसामुळे अनेक कुटुंबांचे नुकसान झाले. त्यांना मदतीचा हात दिला. त्यांचे संसार पुन्हा उभे करून दिले. या माध्यमातून सध्या पवार मतदारसंघात लोकांचे मसिहाच झाले आहेत. हे आता पालकमंत्र्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. लोकांच्या मदतीला धाव जाणारा व त्यांना तातडीने मदत करणार नेता म्हणून पवार यांची ओळख मतदारसंघात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)