डेक्कन क्वीनचे दरवाजे आता यार्डातही बंद

पुणे – पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीनचे दरवाजे रात्री यार्डात आल्यानंतर बंद करण्यात येणार आहेत. यार्डात दरवाजे उघडे ठेवल्याने काही प्रवाशांकडून सकाळी लवकर यार्डात जाऊन सीटवर ताबा घेतला जात होता; तर काहींची रात्रीची सोय होत असे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून येत्या काही दिवसांत अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मुंबईवरून पुण्यात रात्री 8.30 वाजता गाडी दाखल झाल्यानंतर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तिला यार्डात नेण्यात येते. तेव्हापासून पुढील दिवशी सकाळी 6.45 वाजेपर्यंत ती यार्डातच राहाते. या कालावधीत दरवाजे उघडे ठेवण्यात येत असल्याने अनेक भिकाऱ्यांचे ते हक्काचे आगार बनून गाडीमध्ये घाण होत होती. याबाबत अनेक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच पुणे-मुंबई दरम्यान दैनंदिन प्रवास करणारे पासधारक उघड्या दरवाजांचा फायदा घेत जागा धरण्यासाठी थेट यार्डातच जात असल्याचे निदर्शनास आले आहे. डेक्कन क्वीन सकाळी 6.45 वाजता यार्डातून पुण्याच्या प्लॅटफॉर्म पाचवर दाखल होत सकाळी 7.15 वाजता मुंबईकडे मार्गस्थ होते. मात्र पासधारक थेट यार्ड गाठत उघड्या दरवाजातून आत शिरत सीटवर बसत होते. तसेच काहीजण सहकाऱ्यांची देखील जागा राखून ठेवत असल्याचे दिसून आले. यामुळे यार्डात दरवाजे बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष अंमलबजावणी करणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)