डेबिट कार्ड आणि विमासंरक्षण

आजकाल डेबिट कार्डवर अनेक सुविधा आता निशुल्क दिल्या जात आहेत. एवढेच नाही तर या माध्यमातून मोठ्या नुकसानीची देखील भरपाई होऊ शकते का? असा जर प्रश्‍न विचारला तर होय असेच उत्तर येईल. कारण जवळपास सर्वच बॅंका डेबिट कार्डवर अनेक प्रकारच्या विमा सुविधा प्रदान करत आहेत. मग ती बॅंक खासगी असो किंवा सरकारी असो. ग्राहकांना विमा कवच देण्यासाठी बॅंकांनी पुढाकार घेतला आहे. विम्याची ही रक्कम थोडीथोडकी नाही तर तीन कोटी रुपयांपर्यंत आहे. विम्याची ही रक्कम पाहून आपण गोंधळला असाल, मात्र ही बाब खरी आहे. जेव्हा गरज पडेल, तेव्हा ताकदीनिशी आपण विम्याचा दावा ठोकू शकतो. जर दाव्यात तथ्य आढळून आल्यास आपल्याला विम्याच्या माध्यमातून भरपाई मिळू शकते.

सुविधा कशी आहे? – बहुतांशी बॅंका डेबिट कार्डवर दुर्घटना आणि मृत्यू विमा प्रदान करत आहे. जर आपण या माध्यमातून एखादे सामान खरेदी करत असाल किंवा अन्य सेवा घेत असेल तर त्यासाठी विमा दिला जातो. जर आपण डेबिट कार्डच्या माध्यमातून विमानाचे तिकीट बुक केले असेल तर आपल्याला दुर्घटना विमा कवचाचा लाभ मिळतो आणि तोही मोफत.

बहुतांशी प्रकरणात डेबिट कार्डमधून जेव्हा शॉपिंग केली जाते तेव्हा त्या सामानाची खरेदी केल्यानंतर तीन महिन्यांच्या आत चोरी, आग किंवा प्रवासात हानी पोचल्यास विमा कवच दिले जाते. मात्र, त्या कार्डवर काय काय सुविधा आहेत आणि किती विमा कवच दिला आहे, हे त्या कार्डच्या श्रेणीवर अवलंबून आहे.

यासाठी बॅंकांनी आपल्या धोरणानुसार ग्राहकांना विमा कवचाचा लाभ दिला आहे; परतु विम्याची रक्कम ही कोटीच्या घरात असेल यात शंका नाही. तसे पाहिले तर बॅंक स्वत: विमा प्रदान करत नाही तर त्यासाठी विविध प्रकारच्या जनरल इन्शूरन्स कंपनींबरोबर करार केला जातो.

बॅंकांची ऑफर : भारतात डेबिट कार्डची सेवा व्हिसा, मास्टरकार्ड, रुपेसारख्या कंपन्यांकडून दिली जात आहे. रुपे इन्शूरन्स प्रोग्रॅम 2017-18 नुसार पीएनबी रुपे डेबिट कार्डधारक त्यांच्या कुटुंबीयांना दुर्घटना, अपंगत्व आणि मृत्यूचा विमा प्रदान करते. खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बॅंक आपल्या प्रीमियम डेबिट कार्डच्या माध्यमातून खरेदी केलेल्या उत्पादकास पाच लाखांपर्यंतचा विमा प्रदान करते.

बॅंकेच्या रुबिक्‍स डेबिट कार्डवर तिकीट खरेदी केल्यास तीन कोटींपर्यंत हवाई विमा सुरक्षा प्रदान केला जातो. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीतील दुर्घटनेप्रकरणी 15 लाखांचा व्यक्तिगत विमा दिला जातो. यानुसार एचडीएफसी बॅंक इजीशॉप इंटरनॅशनल गोल्ड डेबिट कार्डवर हवाई, रस्ता अणि रेल्वे दुर्घटनेत मृत्यू झाल्यास संबंधिताच्या नातेवाईकास पाच लाख रुपयांपर्यत भरपाई दिली जाते. जर कार्डच्या माध्यमातून एखादे सामान खरेदी केले असेल आणि त्या सामानाची आगीमुळे किंवा चोरीमुळे हानी झाली असेल तर 50 हजारांपर्यंत विमा दिला जातो.

या सुविधेचा लाभ खरेदी केल्यापासून सहा महिन्यांपर्यंत केला जातो. या कार्डवर प्रवासादरम्यान सामान चोरीस गेल्यास 20 हजारांपर्यंत विमा दिला जातो. याशिवाय अन्य बॅंका देखील अनेक प्रकारच्या विमा सुरक्षा प्रदान करतात.

लाभ कसा घ्यावा
आपण ज्या बॅंकेच्या डेबिट कार्डचा वापर करत आहात, त्या बॅंकेच्या शाखेत यासंबंधीची सर्व माहिती मिळवू शकता. यासंदर्भात आपल्या नातेवाईकांना देखील माहिती द्यावी. जर आपण डायरीत याबाबत नोंद करून ठेवली तर अधिक उत्तम राहील. दुर्घटना झाल्यास किंवा सामान चोरीस गेल्यास सर्वात अगोदर माहिती पोलिसांना कळवा. जर जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास आपण रुग्णालयाची कागदपत्रे आणि पोस्टमॉर्टेमच्या अहवालाबरोबर संबंधित बॅंकेशी संपर्क करा. हा दावा संबंधित जनरल इन्शूरन्स कंपनीकडे जाईल. किरकोळ औपचारिकता पूर्ण केल्यानंतर विम्याची रक्कम आपल्याला मिळेल. दुर्घटनेस्थळी मृत्यू झाल्यास विमा कवर कार्डधारकाच्या वारसदारांना मिळेल. यासाठी सर्व आर्थिक बाबीला वारसदाराची नोंद करणे गरजेचे आहे. गरज पडल्यास त्यात अपडेट करत राहा. याप्रमाणे सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपण जागरुक असणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

– स्वरदा वैद्य

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)