आपत्कालीन जिना ठरतोय मृत्यूचा सापळा

दहा महिन्यांत दोघांचा मृत्यू, दोन जखमी

पिंपरी – संकटकाळी बाहेर पडण्यासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात बनवण्यात आलेला आपत्कालीन जिना अपघाताचे कारण बनत आहे. हा मार्ग रुग्ण पळून जाण्यासाठी वापरत असल्याचे चित्र समोर आले आहे. परंतु पळून जाण्याचा थरारक प्रयत्न अपघाताचे कारण बनत आहे. गेल्या दहा महिन्यांमध्ये चार जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला तर दोनजण जखमी झाले आहेत. पुन्हा एकदा एका रुग्णाने असाच प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी या रुग्णाला मोठी कसरत करुन बाहेर काढले आणि त्याचे प्राण वाचवले.

जुलै 2018 ते एप्रिल 2019 या दहा महिन्याच्या कालावधीत चार जणांनी याच जिन्याचा वापर करत दुसऱ्या, तिसऱ्या तर काहींनी थेट सातव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोण जण जखमी झाले आहेत. वायसीएम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 22) सकाळी रुग्णालयाच्या सातव्या मजल्यावरुन डक्‍टच्या पाईपवरून उतरुन रुग्णाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तो पाचव्या मजल्यावर अडकला. तपसी भुकल राजभर (वय-45 रा. बालाजीनगर, भोसरी) असे त्या रुग्णाचे नाव आहे. राजभर यांना दारुचे व्यसन होते. उलट्या आणि अतिसार होत असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. राजभर हे सहाव्या मजल्यावर ऍडमिट होते.

सोमवारी सकाळी राजभर यांची पत्नी बाहेर गेली असताना त्यांनी पळ काढला. सातव्या मजल्यावर जाऊन डक्‍टमधून खाली जाण्यासाठी बाथरूमच्या पाइप पकडून ते खाली उतरताना पाचव्या मजल्यावर अडकून पडले. राजभर बेडवर न दिसल्याने त्यांची पत्नी आणि कर्मचाऱ्यांनी शोधाशोध केली. राजभर हे डक्‍टमध्ये अडकल्याचे लक्षात आल्यानंतर अग्निशमन दलाला देखील कळवण्यात आले. मात्र, वेळ कमी असल्याने सुरक्षारक्षक निलेश दुबळे यांनी चौथ्या मजल्यावरून दोरीच्या सहायाने बाहेर काढले. राजभर यांच्या पायाला काच लागल्याने ते जखमी झाले. 10 मे 2018 रोजी एका रुग्णाचा मृतदेह आढळला. तपासाअंती रुग्णाने उडी मारल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. 5 जून रोजी एका रुग्णाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. खाली कचराकुंडी असल्याने तो गंभीर जखमी झाला. 6 ऑगस्ट रोजी शंकर पात्रे (वय-45) या रुग्णाने रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली होती, त्यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृत्यूची नोंद आत्महत्या अशी केली आहे.

संवेदनशील विभागाबाबत डॉक्‍टरच असंवेदनशील
रुग्ण व्यसमुक्‍तीसाठी रुग्णालयात उपचारासाठी आले होते. मात्र आपत्कालीन जिन्यावरून जाऊन थेट दुसऱ्या तिसऱ्या किंवा सहाव्या मजल्यावरून उडी मारून बाहेर पळून जाण्याचा किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. ही चौथी घटना घडली असली तरी वरिष्ठ अधिकारी मात्र याबाबत ठोस उत्तर न देता असे प्रकार घडणारच या मानसिकतेत काम करत आहेत. व्यसनमुक्‍ती या संवेदनशील विभागातील डॉक्‍टरांचीच संवेदना संपली आहे की काय, पालिका लक्ष देणार काय? असा सवाल आता वायसीएम येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पडला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)