फलटण – महाड-पंढरपूर राज्य मार्गावर बरड, ता. फलटण गावच्या हद्दीत एस. टी. बस आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जीवंधर श्रीरंग बजबळकर (रा. पिंपरी, ता. माळशिरस), प्रेम आकाश पंढरे (रा. 22 फाटा धुळदेव, ता. फलटण) अशी अपघातातील मृतांची नावे असून सौ. पुनम आकाश पंढरे (वय 25 रा. 22 फाटा, धुळदेव, ता. फलटण) असे जखमी महिलेचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, जीवंधर बजबळकर, प्रेम आकाश पंढरे आणि सौ. पुनम आकाश पंढरे हे तिघेजण एकाच बुलटवरुन पंढरपूरबाजूकडून फलटणच्या दिशेने कोर्टाच्या कामासाठी निघाले होते. त्यांची दुचाकी फलटण तालुक्यातील बरड गावच्या हद्दीतील भोईटे पेट्रोल पंपानजीक आली असतानाच समोरुन आलेल्या स्वारगेट – पंढरपूर या एसटी बसने बुलेटला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या धडकेत प्रेम आकाश पंढरे यांचा जागीच मृत्यू झाला तर सौ. पुनम आणि जीवंधर हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळावरील उपस्थितांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, जीवंधर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पुनम यांच्यावर अधिक उपचार सुरु आहेत. दरम्यान, एसटी चालक राजेंद्र नागुदास सातपुते विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस उप निरीक्षक बोंबले अधिक तपास करीत आहेत.