मुंबई – चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळील होर्डिंग कोसळून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. हा अपघात बुधवारी सकाळी घडला. मधुकर नार्वेकर (वय 62) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हे होर्डिंग पश्चिम रेल्वेअंतर्गत येत असल्याची प्राथमिक माहिती समजते.
चर्चगेटमध्ये स्टेशन परिसरातील होर्डिंग बुधवारी दुपारी कोसळले. या होर्डिंगखाली सापडल्याने मधुकर नार्वेकर यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागला. त्यांना तातडीने जी टी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. होर्डिंग कोसळण्यामागील नेमके कारण काय, हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
चर्चगेट स्थानकाच्या बाहेरील बाजूस महात्मा गांधी यांचे भित्तीचित्र आहे. या भित्तीचित्राचा काही भाग रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचाऱ्यावर कोसळला. हे भित्तीचित्र ब्राझीलच्या कलाकाराने साकारले आहे. दरम्यान, गतवर्षी ऑक्टोंबरमध्येही पुण्यात अशीच दुर्घटना घडून 4 जणांचा मृत्यू झाला होता.