डीबीटी अनुदान अजूनही पालिकेच्या तिजोरीत

जुन्या साहित्यावर मुलांची शाळा : अनुदान मिळण्यास आणखी काही दिवसांची प्रतीक्षा

पुणे – महापालिका शाळांमधील मुलांना यंदाही डीबीटीद्वारे शालेय साहित्य तसेच गणवेशाचे अनुदान थेट बॅंकेत जमा केले जाणार आहे. मात्र, शाळा सुरू होऊन दोन आठवडे झाले तरी हे अनुदान अद्यापही पालिकेच्या तिजोरीतच आहे. विशेष म्हणजे, हे अनुदान मुलांच्या खात्यात जमा करण्यासाठी शिक्षण विभागाचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांचे प्रशिक्षण अद्यापही झालेले नसल्याने हे अनुदान वाटपाची यादीच तयार झालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुलांना जुना गणवेश आणि जुने शैक्षणिक साहित्य घेऊनच शाळेचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची वेळ आली आहे.

महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सुमारे 1 लाख विद्यार्थी आहेत. त्यांना मागील वर्षापासून थेट बॅंक खात्यात शालेय साहित्य तसेच गणेशाचे अनुदान दिले जाते. त्यासाठी मागील वर्षी शिक्षण विभागाकडून सर्व मुलांची बॅंक खाती उघडण्यात आली होती. ही सर्व प्रक्रिया मागील वर्षी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे सर्वच मुलांची बॅंकखाती तयार असून त्यावर केवळ अनुदानाची रक्‍कम जमा करायची आहे. मात्र, या सर्वच मुलांची इयत्ता बदलली असून काही वरच्या वर्गात गेली आहेत, तर काही शाळा सोडून दुसऱ्या शाळांमध्ये गेली आहेत. तर काही मुले आहे त्याच वर्गात आहेत. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतरच पटसंख्येचा आकडा निश्‍चित होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षातील लाभार्थ्यांची संख्या निश्‍चित होईपर्यंत त्यांच्या खात्यात अनुदान जमा करणे शक्‍य नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे 30 जूनपर्यंत पहिल्या टप्प्यातील अनुदान देण्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात मुलांच्या बॅंक खात्याच्या क्रमांकाची नोंदणी करणे तसेच इतर कामे करण्यासाठी आवश्‍यक असलेले प्रशिक्षणच अद्याप कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले नाही. त्यामुळे अद्याप कोणत्याही मुलांची यादी तयार झालेली नसल्याचे चित्र आहे. परिणामी, या माहितीची डेटा एन्ट्री करून प्रत्यक्ष बिले तयार करणे आणि ही रक्‍कम मुलांच्या खात्यात जमा होण्यासाठी जुलै महिनाही संपणार असल्याचे चित्र आहे.

रेनकोटविनाच यंदाचा पावसाळा
शहरात जून महिन्याच्या अखेरीस पाऊस सुरू झाला असून जुलै महिन्यातही चांगला पाऊस आहे. अशावेळी या अनुदानात मुलांना देण्यात येणाऱ्या रेनकोटचाही समावेश आहे. त्यामुळे हे अनुदान शाळा सुरू होण्यापूर्वीच मुलांना मिळाले असते तर किमान मुलांना पावसाळ्यासाठी रेनकोट घेता आले असते. मात्र, आता अनुदानच नसल्याचे पालकांकडून मुलांना तसेच शाळेत पाठविण्यात येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा अनुदान बॅंक खात्यात येऊनही मुलांना रेनकोटविनाच पावसाळा घालवावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)