पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पक्ष नेतृत्वाचा आदेश मान्य करत विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा आज मंगळवारी (दि. 9) महापौर कार्यालय व शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे सुपूर्द केला. शहराध्यक्ष वाघेरे यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार आहे, याबाबत उत्सुकता आहे.
राष्ट्रवादीने ठरविलेल्या धोरणानुसार पक्षातील पाच नगरसेवकांना प्रत्येकी एक वर्ष विरोधी पक्षनेते पदावर संधी देण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतला आहे. त्यानुसार साने यांच्या पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांना अजित पवार यांनी राजीनामा देण्याची सूचना केली होती. त्यानुसार त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. दत्ता साने यांनी आपल्या कार्यकाळात सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडले. अनेक विषयांना त्यांनी हात घालत सत्ताधारी पक्षाचा पारदर्शकतेचा बुरखा फाडला.
विरोधी पक्षनेतेपदाच्या कार्यकालाबाबत समाधानी : साने
विरोधी पक्षनेतेपदाच्या कालावधीत केलेल्या कामाबाबत साने यांनी समाधान व्यक्त केले. लोकशाहीतील विरोधी पक्षनेता प्रबळ असल्यास, सत्ताधारी पक्षावर नक्कीच अंकुश ठेवता येतो, हे मी दाखवून दिले. भोसरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असून आता या मतदार संघावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मला वेळ मिळणार आहे, असे साने यावेळी म्हणाले.