चाकूचा धाक दाखवत वृद्ध दाम्पत्याला लुटले

राजगुरूनगर (प्रतिनिधी) : आंबोली ता खेड गावाच्या काळडोकवाडी येथे आज रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात चोरटयांनी घरात प्रवेश करून वृद्ध दाम्पत्याचे हातपाय बांधुन व तोंडात बोळा कोंबून सु-याचा धाक दाखवत दागिने व रोख रक्कम असा १ लाख १७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला. या घटनेमुळे तालुक्याच्या पश्चिम भागात चोरट्यांची दहशत बसली आहे.

याबाबतची खेड पोलिसांनी दिलेली महिती अशी की, आंबोली (ता खेड ) येथील काळडोकवाडीतील मालाबाई रामभाऊ काळडोके व तिचे पती रामभाऊ काळडोके हे त्यांच्या राहत्या घरी  झोपले होते. आज रात्री दिड वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा जोर जोराने वाजवला व तो उचकटून त्यांनी घरात प्रवेश केला. त्यांच्या आवाजाने  मालाबाई जाग्या झाल्या.

आलेल्या चोरट्यानी त्यांना दागिने व पैसे कोठे ठेवले आहेत असे दम देऊन विचारले.चोरट्यांनी मालाबाई यांच्या अंगावरील मंगळसुत्र, कुड्या, बुगड्या काढून घेतले. त्यांचे हातपाय साडीने व जवळच असलेल्या फडक्याने बांधले. रामभाऊ काळडोके यांचे हातपाय बांधले. मोठ्याने ओरडयाचे नाही असा त्यांच्याजवळ असलेला सुरा दाखवून चोरट्यांनी दम दिला. या चोरट्यानी घरातील लोखंडी पत्र्यांची उचकटुन १६ हजार रुपये किमतीचा सोन्याचा दागिना काढून घेतला

त्यातील एक तोळयांचा दागिना काढून घेतला. मालाबाई यांच्या बटव्यातून एक हजार रुपये हिसकावून घेतले. अधिकचा ऐवज चोरण्याच्या प्रयत्नात त्यांनी घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त केले. त्यानंतर चोरट्यानी तेथून पोबारा केला.

या घटनेची फिर्याद मालाबाई रामभाऊ काळडोके वय 70 यांनी खेड पोलिसांत दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार
दोन तोळे सोन्याचा पुतळ्याचा आठ पुतळ्यायाचा व त्यात सोन्याचे मणी असलेला दागिना (किंमत ५० हजार रुपये) दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र((किंमत ४० हजार रुपये) तीन ग्रॅम वजनाच्या  कानातील सोन्याच्या कुड्या (किंमत ६ हजार रुपये), २ ग्राम  सोन्याच्या बुगडया(किंमत ४हजार रुपये)  व रोख १७हजार रुपये असा१ लाख १७ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबविला असल्याची फिर्याद दिली आहे.

दरोडा घालणारे चोरटे उंचीने बुटके असून मराठी व बिहारी भाषा बोलत होते असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत खेड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध दरोड्याचा  गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पडवळ करीत आहेत. ग्रामीण भागात राहणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांची घरे चोरट्यानी आता लक्ष केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)