डँड्रफ प्राॅब्लेम्स

-डाॅ.अभय सावंत

डॅंड्रफ अर्थात केसातला कोंडा बहुतेक सर्वांनाच होतो हे खरे आहे का? दहा पैकी पाच किंवा सहाजणांना कोंड्याचा त्रास होतो. विशेषत: स्त्रियांमध्ये डोक्‍यात कोंडा होण्याचे प्रमाण अर्थात जास्त आढळून येते. उन्हाळ्यातील गरमीबरोबर कमी होत जाणारा डोक्‍यातील कोंडा हा थोडी थंडी पडू लागली मात्र पुन्हा डोके वर काढतो. कोरड्या आणि थंड वातावरणात कोंडा जास्त प्रमाणात होतो.

कोणत्या वयात कोंडा जास्त होतो? सर्वसामान्य प्रकारचा कोंडा (ज्याला गार्डन व्हरायटी असं म्हणतता) तो पस्तीशी किंवा चाळिशीमध्ये जास्त प्रमाणात दिसतो. क्रॅडल कॅप नावाचा कोंडा तान्ह्या बाळालासुध्दा होतो. आईच्या शरीरातली काही हार्मोन्स बाळाच्या रक्‍तात मिसळली तर हा कोंडा होतो. सहा महिन्यांत बाळाच्या रक्‍तातले हे हार्मोन्स नष्ट होतात आणि कोंडाही आपोआप नाहीसा होतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

किशोरवयात कोंडा वारंवार का होतो? दोषच द्यायचा असेल तर आपल्या जीन्सना म्हणजे जनुकांना द्यायला हवा. काही जणांमध्ये ते अनुवंशीकच असते. मस्तकाच्या त्वचेच्या पेशी शरीरातील इतर ठिकाणी असलेल्या त्वचेच्या पेशींप्रमाणेच खालच्या थरातून वरच्या थरात सरकत येत असतात. मग त्या बाहेर टाकल्या जातात. याला 28 दिवस लागतात. या पेशी अतिसूक्ष्म असल्यामुळे साध्या डोळ्यांना दिसत नाहीत. अंघोळ करताना त्या निघून जातात, पण अनुवंशीकतेमुळे कोंडा होणाऱ्या व्यक्‍तींमध्ये ही प्रोसेस जरा वेगळी असते. शिवाय किशोर वयात हार्मोन्समध्ये बदल होत असतो. त्याचाही परिणाम असतो.

स्त्री असो की पुरुष असो दोघांमध्येही टेस्टेस्टेरॉन हे हार्मोन तयार होत असते, पण दोघांमध्ये त्याचे प्रमाण कमी जास्त असते. हे टेस्टेस्टेरॉन 5-डायहायड्रो टेस्टेस्टेरॉन (5-डीएचटी) मध्ये रूपांतरित होते. हे रसायन सीबॅसीयस किंवा तैलग्रंथींना चालना देणारे असते. या तैलग्रंथी त्वचेमध्ये असतात. हे सिबम त्वचेमधून पाझरायला लागते, पण अनुवंशीकता हे कोंड्याचं कारण असलेल्या व्यक्‍तीमध्ये हे सीबम तयार होण्याचं प्रमाण सामान्य माणसाच्या तुलनेत 15 ते 20 पटीने जास्त असते. मस्तकाच्या त्वचेतील निर्जीव पेशी बाहेर पडून जात नाहीत. त्या या तेलकट सीबममुळे केसांमध्येच एकमेकांना चिकटतात. त्यालाच आपण कोंडा म्हणतो. मस्तकाच्या त्वचेत यीस्टसारखे सूक्ष्म जंतू कायम वस्तीला असतात. ते या कोंड्याच्या खाली मोठ्या संख्येने वाढतात. त्यामुळे डोक्‍याला खाज येते.

कोंडा का होतो?

त्वचेच्या तैलग्रंथीतून निघणारे सीबम हे तेलकट असल्यामुळे जेवणामध्ये तेलकट आणि तूपकट पदार्थ खाल्ल्यामुळे सीबमचे प्रमाण वाढते, असा एक समज होता, पण त्याचे कारण हार्मोन्स हे आहे. रोज केसांना तेल लावल्याने कोंडा होत नाही. तेलापेक्षा हे सीबम खूप वेगळे असते उलट रोज केसांना तेल लावल्याने आणि केस विंचरल्याने केसांमधला कोंडा काढून टाकण्यास मदतच होते. पण कंगवा जास्त वेळा फिरवू नये. त्यामुळे इन्फेक्‍शन दुसरीकडे पसरू शकते. केसातील कोंड्याचा आरोग्यावर तसा कोणताही वाईट परिणाम होत नाही, पण नखाने डोके खाजवल्यामुळे त्वचेचे बॅक्‍टेरीअल इन्फेक्‍शन होऊ शकते. मानेला अवधान म्हणजे गाठी येतात, पण ही लक्षणे दीर्घकाळ कोंडा असेल तरच दिसतात.

कोंड्यावर प्रभावी उपाय कोणता आहे?

कोंडा होणे हे अनुवंशीक असल्यामुळे त्यावर रामबाण असे औषध अजूनही निघाले नाही, पण रोजच्या रोज डोक्‍यावरून अंघोळ करा. आठवड्यातून दोनवेळा शांपूने केस धुवा. कोंडा जातो. शांपूचे मूळ दोन प्रकार आहेत. एक केसांचा शांपू आणि दुसरा आहे त्वचेचा शांपू. केसांच्या शांपूमुळे फक्‍त केसच स्वच्छ होतात, पण त्वचा स्वच्छ होत नाही. केसात कोंडा असेल तर केसांचा शांपू लावून कोंडा जात नाही. शांपूची सीबम आणि यीस्टवर क्रिया व्हायला हवी. तरच कोंडा जाईल. या शांपूमध्ये सेलीनियम सल्फाईड (सेल्सम), सीटाव्हॅलॉन, झिंक पायरीथीओन किंवा टार ही रसायने असतात. अशा शांपूने आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा डोके धुतले तर कोंडा जातो. मात्र, वारंवार तोच शांपू वापरला तर त्याचा प्रभाव कमी होतो. त्याला टॅकीफिलॅक्‍सीस असे म्हणतात. म्हणून प्रत्येकवेळेस वेगळा शांपू वापरावा. किंवा एकदा केसाचा आणि एकदा त्वचेचा शांपू वापरावा. नखाने खाजवल्यामुळे बॅक्‍टेरीयाचे इन्फेक्‍शन झाले असेल तर अँटीबायोटीक्‍स औषध आणि मलम वापरावे लागते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)