दांडग्या जनसंपर्काच्या बळावर होईल एकमत

श्रीनिवास पाटील यांचे नाव आघाडीवर
साताऱ्यातून खासदारकीची करणार हॅट्‌ट्रीक?

सम्राट गायकवाड

सातारा – माढा पाठोपाठ आता सातारा लोकसभा मतदारसंघात देखील राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीचा सस्पेंस वाढू लागला आहे. साताऱ्यातून खा. शरद पवार यांनी लढावे आग्रह करण्यात येत असताना ऐनवेळी पवारांनी लढण्यास नकार दिला तर श्रीनिवास पाटील यांचा प्राधान्याने विचार करण्याची मागणी पुढे येत आहे. दहा वर्ष खासदार व माजी राज्यपाल त्याचबरोबर दांडगा जनसंपर्क आणि मनमिळावू स्वभाव या बलस्थानांमुळे पाटील यांच्या नावावर एकमत होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे विशेषत: कराड व पाटण तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण
झाले आहे.

सन 1999 मध्ये राष्ट्रवादीची पक्ष स्थापना झाली. तेव्हा झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघातून स्व. लक्ष्मणराव पाटील तर कराड मतदारसंघातून श्रीनिवास पाटील हे निवडून आले. तेव्हापासून ते आजपर्यंत जिल्हा राष्ट्रवादीचा अभेद्य बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, आता स्व. लक्ष्मणवराव पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत ज्येष्ठ नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी श्रीनिवास पाटील यांच्या रूपाने भरून काढण्यात यावी अन्‌ त्यासाठी सातारा लोकसभेसाठी पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी, असा विचारप्रवाह पुढे येत आहे.

साहजिकच त्यामागे यापुर्वी 10 वर्ष नेतृत्व केलेल्या कराड लोकसभा मतदारसंघाचा 60 टक्‍क्‍यापेक्षा अधिक भाग नूतन सातारा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट झाला आहे. त्यामध्ये कराड, पाटण, जावली, महाबळेश्‍वर तालुक्‍यासह इतर भागाचा समावेश आहे. त्यामुळे आपसुकच पाटील यांच्या उमेदवारीचा दावा अधिक भक्कम होत आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्याशी पाटील यांचे महाविद्यालयीन काळापासून असलेला स्नेह व विश्‍वास जमेची बाजू मानली जात आहे. त्याचबरोबर पाटील यांचा कराड लोकसभा मतदारसंघात कार्यरत असताना प्रत्येक गाव अन्‌ वाडीवस्त्यांवर असलेला जनसंपर्क अद्याप कायम आहे. तसेच राज्यपालपदावर कार्यरत असताना देखील त्यांनी सातारा जिल्ह्याशी असलेला संपर्क तसूभर ही कमी होवू दिला नाही.

उलट राज्यपालपदानंतर पाटील यांनी जनसंपर्क प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वाढविला आहे. ज्या ज्या वेळी पवार सातारा दौऱ्यावर आले त्या त्या वेळी पाटील हे त्यांच्या स्वागताला आवर्जुन उपस्थित राहिले. तेव्हापासूनच ते सातारा लोकसभा मतदारसंघातून लढणार, या चर्चांना सुरूवात झाली होती. मात्र, आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास काही दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे इतर पक्षांसह राष्ट्रवादीनेही मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणादेखील होणार आहे.

मात्र, ज्या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्या ठिकाणी ऐनवेळी उमेदवारी जाहीर करण्याचे धोरण पवारांकडून राबविले जाणार हे निश्‍चित आहे. त्यामध्ये माढ्यासह साताऱ्याचा समावेश आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा असलेल्या सातारा लोकसभेचे नेतृत्व पवारांनी करावे, अशी मागणी पुढे येत असताना ऐनवेळी पवारांना यु टर्न घ्याव लागला तर स्व. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे वारसदार असलेले श्रीनिवास पाटील यांच्याच नावाचा विचार झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी पुढे येत आहे.

…तर पाटणचीही जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात

श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य राहणारच आहे. त्याचबरोबर पाटील यांचा कराड व पाटण तालुक्‍यातील दांडगा जनसंपर्क पाहता ते तिसऱ्यांदा लोकसभेत जातीलच. त्याचबरोबर लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कराड-दक्षिण व कराड-उत्तरमध्ये भाजपचा प्रभाव रोखता येणार आहे. त्याचबरोबर पाटण विधानसभेची देखील जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात आणण्यास सर्वाधिक मदत होणार असल्याचे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले.

कराड, पाटणात सभेची गरजच लागणार नाही

कराड व पाटण तालुक्‍यात श्रीनिवास पाटील यांचा जनसंपर्क आज ही इतका दांडगा आहे की त्यांच्या उमेदवारीची चर्चा होताच कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. साहेबांना उमेदवारी मिळाली तर त्यांना कराड अन्‌ पाटण तालुक्‍यात एक ही सभा घ्यावी लागणार नाही. दोन्ही तालुक्‍यातील प्रचार ते मतदान करून घेण्याची सर्व जबाबदारी आम्ही कार्यकर्तेच पार पाडू, असा विश्‍वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

पुण्याचा विषय अद्याप अधांतरी

श्रीनिवास पाटील पुणे लोकसभा मतदारसंघातून लढणार अशा देखील चर्चा मध्यंतरीच्या कालावधीत झाल्या. मात्र, पुण्याची जागा कॉंग्रेसकडे असल्याने अन्‌ विश्‍वजीत कदमांच्या पराभवानंतर पुणेकर उपरा उमेदवार स्विकारत नाहीत, हे संकेत मिळाल्याने पाटील यांच्या उमेदवारीचा जोर पुढे वाढलाच नाही. मात्र, तरीदेखील कॉंग्रेसला पुण्याच्या बदल्यात अहमदनगरची जागा देवून वाटाघाटी करण्याचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत. त्यामुळे जागा वाटप जाहीर झाल्यानंतर अधिक चित्र स्पष्ट होणार आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)